पुणे - सध्या राज्यतील तापमान पाहिले, तर सकाळी अकरानंतर आपल्याला बाहेर पडणे कठीण असते. आपण थंड पाणी किंवा सावली शोधतो. मात्र, या मुख्या प्राण्यांना बोलता येत नसल्याने त्यांची काळजी प्राणी संग्रहालय चांगल्या प्रकारे करत आहेत. कात्रजच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयात ( Rajiv Gandhi Zoological Park ) आता उन्हाळ्याच्या सुटीमुळे पर्यटकांची गर्दी वाढली आहे. राजीव गांधी प्राणी संग्रहालयात सद्यस्थितीला 67 प्रकारचे सुमारे 400 प्राणी आहेत. या सर्व प्राण्यांचे उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी कुलर, वॉटर फॉगर, पाण्याचे हौद, अशी व्यवस्था करण्यात आली आहेत, अशी माहिती येथील पशु वैद्यकीय अधिकारी सुचेत्रा सुर्यवंशी यांनी दिली.
वाघ, हत्ती, अस्वल, साप या प्राण्यांची विशेष काळजी घेण्यात येत आहे. उन्हामुळे त्यांच्या आहारातही बदल करण्यात आले आहेत. या सर्व प्राण्यांचे प्रत्येक उन्हाळ्यात जशी काळजी घेतली जाते, तशी यावर्षी घेतली जात आहे. हत्तीला अंघोळ घातली जाते. वाघांच्या पिंजऱ्यात फॉगर्स सोडले जातात. वाढत्या तापमानामुळे माणसांसोबत प्राण्याच्या अंगाचीही काहिली होत आहे. पुण्यातील तापमान दुपारी सरासरी 42 अंशांपर्यंत वाढत आहे. अशा परिस्थितीत प्राणी संग्रहालयातील तापमान नियंत्रित करणे खुप आवश्यक झाले आहे. हत्ती वाघ, बिबट्या आणि अस्वल यांना उन्हाच्या झळा बसू नये म्हणून त्यांच्या पिंजऱ्यात थंड पाण्याचे सप्रिंकल लावण्यात आले आहेत. वॉटर सप्रिंकल लावून पिंजऱ्यातील तापमान नियंत्रित केले जात आहे. माणसांप्रमाणेच वन्यप्राण्यांनाही उन्हाचा त्रास होत असल्याने राजीव गांधी प्राणी संग्रहालयामध्ये सध्या उन्हाळ्याची तयारी सुरू झाली आहे. अस्वलांसाठी बर्फांपासून केलेले फ्रूट केक, वाघांसाठी कूलर, हरिण, सांबर आणि इतर प्राण्यांसाठी रेनगन, फॉगर्स बसविण्याच्या कामाने वेग घेतला आहे.
तापमानाचा पारा साधारणत: चाळीसच्या पुढे गेल्यानंतर किंवा रात्रीचा गारवा कमी झाला की प्राणी उकाड्याने अस्वस्थ होतात. त्यांनाही उकाड्याचा त्रास होता. काही प्राणी तर तासन तास पाणवठ्यामध्ये बसून राहतात. त्यामुळे उकाडा सुरू झाला की दरवर्षी त्यांना खंदक आणि पिंजऱ्यांमध्ये गारवा मिळेल, यासाठी संग्रहालयातर्फे काळजी घेतली जाते. प्राण्याच्या प्रकारानुसार अगदी साप, साळिंदरापासून ते वाघांपर्यंत प्रत्येकासाठी वेगवेगळ्या उपयायोजना केल्या जातात. संग्रहालयामध्ये सध्या पांढऱ्या आणि पिवळ्या वाघांसाठी कुलर बसवले आहेत. वाघांच्या खंदकामध्ये छोटा पाणवठा करण्यात आला आहे. उकाडा वाढला की वाघ त्या पाण्यात बराच वेळ बसून राहतो आणि डोक्यावर ऊन चढल्यानंतरच तो पिंजऱ्यात येतो. त्यावेळी त्याला कूलरमुळे गारवा मिळतो, असे संग्रहालयाचे पशु वैद्यकीय अधिकारी सुचेत्रा सुर्यवंशी यांनी सांगितले. दरवर्षी आम्ही अस्वलांसाठी आइस, फ्रूटकेक आणतो. हा केक म्हणजे अस्वलांसाठी मेजवानी ठरते. यामध्ये बर्फ तयार होत असतानाच त्यामध्ये अस्वलाला आवडणारी विविध फळे त्यात ठेवली जातात. अस्वल केक समोर आल्यावर मोठ्या खुबीने बर्फातून फळे शोधून खाते, असेही सुर्यवंशी यांनी सांगितले.
बिबट्या, साळिंदर, सांबर, नीलगाय, हरणांच्या खंदकांमध्ये स्प्रिंकलर्स बसविण्यात आले आहेत. गवतावर सातत्याने पाण्याचा शिडकाव होत असल्याने प्राण्यांना उन्हाचा त्रास होत नाही. काही ठिकाणी फॉगर्स बसवले जातात. सुरुवातीला आम्ही प्राण्यांच्या आहारामध्ये काही बदल करत नाही. मात्र, त्यांच्या नियमित तपासणीवेळी मात्र त्यांची आवड लक्षात घेवून त्यांच्या आहारामध्ये बदल करतो. प्राण्यांबरोबरच पर्यटकांनाही संग्रहालयात फिरताना गारवा अनुवायाला मिळावा, यासाठी आम्ही स्प्रिंकलर्स बसविले आहेत, अशी माहितीही सुर्यवंशी यांनी दिली.