पुणे - पिंपरी-चिंचवडमध्ये महानगरपालिकेच्या कचरा जमा करणाऱ्या डंपरने एका पाच वर्षीय चिमुकल्याला धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. तर त्याचे वडील गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी आरोपी चालक सचिन कांबळे यास पोलिसांनी अटक केली आहे.
अर्णव शिवशंकर सोलबने (वय-५) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत चिमुकला आणि वडील शिवशंकर हे दुचाकीवरून मोशी येथील घरी जात होते. तेव्हा, वळणावर भरधाव वेगात असणाऱ्या डंपर ने धडक दिली. यात अर्णवचा जागीच मृत्यू झाला तर वडील शिवशंकर हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी आरोपी चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.
मृत अर्णवचे कुटुंब हे मूळ लातूरचे आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य गेटवर येऊन जखमी मुलाच्या वडिलांनी दाद मागितली आहे. पालिकेकडून काही मदत मिळावी अशी अपेक्षा वडिल शिवशंकर यांनी व्यक्त केली आहे.