मुंबई - जगभरात कोरोनाच्या ओमायक्रॉन म्युटेशनचा प्रसार होऊ लागला आहे. राज्यात कालच डोंबिवलीमधील एका व्यक्तीला ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर आज पिंपरी चिंचवडमध्ये ६ तर पुण्यात १ रुग्ण, आळंदी 1 आणि एक डोबिंवलीत (Omicron Patient Found In Pune) आढळून आले आहे. यामुळे राज्यातील ओमाक्रॉन रुग्णांची (Omicron Variant In Maharashtra) संख्या 9 झाली आहे. आज आढळून आलेल्या सात रुग्णांमध्ये ४ लहान मुलांचा समावेश असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने (State Health Department) दिली आहे.
पिंपरी चिंचवड आणि पुण्यात ओमायक्रॉन -
नायजेरियाची नागरिक असणारी भारतीय वंशाची ४४ वर्षांची महिला तिच्या १२ आणि १८ वर्षांच्या दोन मुलींसह आपल्या भावाला भेटण्यासाठी २४ नोव्हेंबर २०२१ रोजी पिंपरी चिंचवड येथे आली होती. तिचा भाऊ आणि त्याच्या दोन्ही मुली असे एकूण ६ जणांच्या प्रयोगशाळा नमुन्यामध्ये ओमायक्रॉन विषाणू सापडल्याचा अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने आज संध्याकाळी दिला आहे. या सहा जणांपैकी ३ जण नायजेरियाहून आले आहेत, तर इतर तिघे त्यांचे निकटसहावासित आहेत. या तिघींच्या १३ निकटसहवासितांची तपासणी करण्यात आली असून त्यातील या महिलेचा ४५ वर्षाचा भाऊ आणि त्याच्या अनुक्रमे दीड वर्षे आणि ७ वर्षांच्या दोन मुली या कोविड बाधित आल्या होत्या. या तिन्ही निकटसहवासितांमध्येदेखील ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग आढळून आला आहे. नायजेरियाहून आलेल्या महिलेची आजाराची लक्षणे अत्यंत सौम्य असून इतर ५ जणांना कसलीही लक्षणे नाहीत. या सहा जणांपैकी तिघे हे १८ वर्षाखालील असल्याने त्यांनी कोणतीही लस घेतलेली नाही. उर्वरित तिघांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. दोघांनी कोविशिल्ड तर एकाने कोवॅक्सिन ही लस घेतलेली आहे. हे सर्व रुग्ण सध्या पिंपरी येथील जिजामाता रुग्णालयात भरती असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. तसेच पुणे ४७ वर्षीय पुरूषाला देखील या नवीन व्हेरियंटचा संसर्ग झाल्याचे नॅशनल केमिकल लॅबोरेटरीच्या अहवालाने सिद्ध झाले आहे. हा रुग्ण १८ ते २५ नोव्हेंबर २०२१ या काळात फिनलंड येथे गेला होता. त्याला २९ तारखेला थोडासा ताप आला होता. त्यावेळी चाचणी केली असता, तो बाधित आढळून आला आहे.
अति जोखमीच्या देशातील ९ रुग्ण -
राज्यात अति जोखमीच्या देशातून ४९०१ तर इतर देशातून २३ हजार ३२० असे एकूण २८ हजार २२१ प्रवासी राज्यात आले. त्यापैकी अति जोखमीच्या देशातील ४९०१ तर इतर देशातील ५४३ अशा एकूण ५ हजर ४४४ प्रवाशांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यामधून अति जोखमीच्या देशातून आलेले ९ प्रवाशांची चाचणी करण्यात आली होती. त्यातील सर्व ओमायक्रॉन विषाणूमुळे बाधित झाल्याचे समोर आले आहे.
नागरिकांनी भीती बाळगू नये -
विषाणूमध्ये बदल होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून या बाबत जनतेने भीती न बाळगता आपल्या नेहमीच्या व्यवहारात कोविड अनुरुप वर्तनाचा अंगिकार करावा, नागरिकांनी आपले लसीकरण पूर्ण करावे आणि मागील महिनाभरात जे प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास करून भारतात आले आहेत. त्यांनीही आपल्या बाबत स्थानिक आरोग्य विभागास अवगत करावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने सर्व जनतेला करण्यात आले आहे.
हेही वाचा - Omicron Variant : 'ओमायक्रॉन' घातक नाही, मात्र संसर्गाचा वेग प्रचंड - राजेश टोपे