पुणे - पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी सहा जण कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, शहरातील परिस्थिती सावरत असताना अचानक सहा जणांना कोरोना झाल्याचे उघड झाल्याने नागरिकांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण तयार झाले आहे. नव्या रुग्णांमुळे आता शहरातील कोरोनाबाधितांची संख्या ही २१ वर पोहचली आहे. त्यांच्यावर एक खासगी आणि महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा... तबलिगी मरकझ: लातुरात क्वारंटाईन केलेल्या 'त्या' 12 पैकी 8 जणांचा अहवाल 'पाॅझिटिव्ह'
पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण १२ जणांना कोरोनामुक्त करून घरी पाठवण्यात आले आहे. तर तीन जण हे दिल्लीमध्ये झालेल्या धार्मिक कार्यक्रमातून शहरात परतले होते. त्यांचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर आज सहा जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉजिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहर कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत असताना अचानक पुन्हा सर्वत्र घबराट पसरली आहे. आठ रुग्णांवर महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.