पुणे - मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात मोजक्या लोकांच्या उपस्थितीत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना झाली. कोरोनामुळे मंदिर बंद असल्याने निवडक विश्वस्तांच्या उपस्थितीत आणि श्री कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांच्या हस्ते सकाळी ११ वाजून १० मिनिटांनी हा सोहळा साधेपणाने संपन्न झाला. श्रींच्या मूर्ती शेजारी गणेश परिवारातील मूर्तीदेखील विराजमान झाल्या होत्या.
उत्सव काळातदेखील मंदिर बंद राहणार असल्याने कार्यकर्ते मंदिरात दर्शनासाठी जाणार नसल्याचा मोठा निर्णय ट्रस्टतर्फे घेण्यात आला आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने ट्रस्टच्या १२८ व्या वर्षी गणेश चतुर्थीला सकाळी श्रींची प्राणप्रतिष्ठापना झाली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, माणिक चव्हाण, कुमार वांबुरे प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते.
वेदमूर्ती मिलींद राहुरकर आणि वेदमूर्ती नटराज शास्त्री यांच्या पौरोहित्याखाली हा सोहळा पार पडला. उत्सव काळातदेखील मंदिरात केवळ ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत धार्मिक विधी होणार आहेत. गणेश चतुर्थीच्या दिवशी आलेल्या भाविकांनी मंदिरावरील आकर्षक विद्युतरोषणाई पाहण्यासोबतच रस्त्यावरून बाहेरूनच दर्शन घेत कोरोनाचे संकट लवकर दूर होवो, अशी श्रीं ची चरणी प्रार्थना केली. दर्शनासाठी आलेल्या भाविकांकडून हार, फुले, पेढे, नारळ देखील स्वीकारले जाणार नसून प्रसाद दिला जाणार नाही. त्यामुळे भक्तांनी उत्सकाळात गर्दी करू नये व ऑनलाईन दर्शन सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.