पुणे - गेल्या काही काळापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली प्रार्थना स्थळे तसेच धार्मिक स्थळे आजपासून पुन्हा खुली करण्यात आली आहे. गेली एक ते दीड वर्षांपासून बंद असलेली मंदिरे आजपासून सुरू झाल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर पहाटे 6 वाजता राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याहस्ते उघडण्यात आली.
प्रसाद आणि फुल-हार स्वीकारले जाणार नाही -
आजपासून मंदिरे सुरू होत असून कोरोनामुळे दहा वर्षांखालील मुलांना तसेच 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. तसेच भाविकांनी आणलेले प्रसाद आणि फुल-हार हेदेखील स्वीकारले जाणार नाही. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात येत आहे. भाविक सोशल डिस्टनसिंगचा वापर करूनच बाप्पाचे दर्शन घेता आहे. तसेच विनामास्क असलेल्या भाविकांना मंदिरात प्रवेश नाकारण्यात येत आहे.
या नागरिकांनी घरीच थांबावे -
आदेशानुसार 65 वर्षे वयावरील नागरिक, को- मॉरबिड लक्षणे असलेले व्यक्ती, गर्भवती महिला व दहा वर्षांखालील मुले यांनी घरीच थांबावे, धार्मिक स्थळे व प्रार्थनास्थळांचे व्यवस्थापन करणारे व्यक्ती संस्था-संघटना यांनी या ठिकाणी भेट देणारे नागरिक व काम करणाऱ्या कामगारांना कोरोनाची लागण होऊ नये, अथवा प्रसार होऊ नये, याकरिता दक्षता घ्यावी. धार्मिक स्थळे व प्रार्थनास्थळांच्या ठिकाणी गर्दी होऊ नये, याकरिता दोन व्यक्तींमध्ये कमीत कमी सहा फूट अंतर ठेवण्याची व्यवस्था करण्यात यावी.
आरोग्यसेतूचा वापर -
भाविकांच्या आरोग्याबाबत समस्या असल्यास राज्य किंवा जिल्हा हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा. धार्मिक स्थळे अथवा प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी थांबण्यास बंदी राहील. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच आरोग्य सेतू ॲपचा वापरदेखील करण्यात यावा, अशा सुचना प्रशासनातर्फे करण्यात आल्या आहेत.