पुणे - शहरात आता इतर दुकानांनाही रात्री नऊपर्यत खुले ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे..पुणे महापालिका आयुक्तांनी यासंदर्भातले आदेश जारी केले आहेत. राज्य सरकारने हॉटेल व्यावसायिकांना रात्री 10 पर्यंत हॉटेल सुरू ठेवण्याची परवानगी दिली होती. त्यामुळे इतर दुकानदारही रात्रीची वेळ वाढवण्याची मागणी करत होते. सध्या इतर दुकाने ही सायंकाळी 7 वाजेपर्यंतच खुली ठेवण्यास परवानगी होती. त्यामुळे आता पुण्यातील दुकानदारांसाठी दिलासा देणारे हे आदेश आहेत.
पुणे महानगरपालिका क्षेत्रातल्या प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील सर्व अत्यावश्यक वस्तूंची दुकाने सेवा, औषधे विक्री दुकाने, दवाखाने यापूर्वी दिलेल्या परवानगीनुसार त्यांच्या वेळेत दररोज सुरू राहतील. तर पुणे महानगरपालिका क्षेत्रातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील इतर अत्यावश्यक वस्तूंची दुकाने / सेवा (औषधी विक्री दुकाने, दवाखाने वगळुन), अत्यावश्यक सेवा दुकानांव्यतिरिक्त इतर वस्तूंची दुकाने, शॉपिंग मॉल, मार्केट कॉम्प्लेक्स हे सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत खुली राहतील, असे आदेश काढण्यात आले आहेत.
तसेच शॉपिंग मॉल, मार्केट कॉम्प्लेक्स, त्याकरिता निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत सुरू राहतील. मात्र, त्यामधील सिनेमागृह बंद राहतील. हे आदेश पुढील आदेशापर्यंत लागू राहतील. कोविड-१९ च्या प्रतिबंधासाठी या आदेशांचे, मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ ते ६०, तसेच भारतीय दंड संहितेचे कलम १८८ नुसार अन्य कायदेशीर तरतुदीनुसार कार्यवाहीस पात्र राहील, असे देखील आदेशात नमूद करण्यात आले आहे.