पुणे - इतिहासात 'अल्याड जेजुरी, पल्याड सोनोरी, मध्ये वाहते कर्हा पुरंदर शोभती शिवशाहीचा तुरा', असे वर्णन असलेला किल्ला म्हणजे पुरंदर. या किल्ल्याला वज्रगड म्हणूनही ओळखले जाते. शिवाजी महाराजांचा जन्मही याच गडावर झाला होता. इतिहासात पुरंदरच्या तहालाही विशेष महत्व आहे. आज शिवजयंतीनिमित्त पुरंदरच्या तहाची गोष्ट जाणून घेऊया...
शाहिस्तेखानाने स्वराज्य अक्षरश: लुटले होते. शिवाजी महाराजांनी धाडसी छापा मारून लालमहालात घुसून शाहिस्तेखानाला हुसकून लावले. यात शाहिस्तेखानाचे प्राणांवरून बोटांवर निभावले. महाराष्ट्रातून तो निघून गेला. पण स्वराज्याचे प्रचंड आर्थिक नुकसान झालेले होते.
सुरतेची चढाई
मोगलांनी केलेले नुकसान त्यांच्याकडूनच वसूल करून घेण्यासाठी १६६४ मध्ये शिवाजी महाराजांनी सुरतेवरच हल्ला केला आणि त्या व्यापारी शहरातून प्रचंड लूट केली. मुघल सुभेदाराने पाठवलेल्या वकीलालाही अटक केली. सुरत हे बंदर आणि मुख्य व्यापारी शहर, मोगलांची आर्थिक राजधानी असल्याने ही लूट मोगलांना खूपच महागात पडली. औरंगजेब यामुळे संतापला. शिवाजी महाराजांचा बिमोड करण्यासाठी त्याने मिर्झाराजे जयसिंग यांच्या हाताखाली ८० हजारांचे कडवे सैन्य घेऊन निघाला. दिलेरखानही त्याच्या सोबत होता.
दिलेरखान आणि मिर्झाराजे स्वराज्यात
महाराजांनी आपल्या सोयीची रणभूमी असावी म्हणून पुरंदर गडाची निवड केली. स्वराज्याचे केंद्र त्यांनी या युद्धापासून दूर ठेवले. दिलेरखानाने शेजारच्या वाज्रागादावरून पुरंदरवर तोफांचा भडीमार करून पुरंदरच्या तटबंदीला खिंडार पाडले. मोगल सैन्य किल्ल्यात घुसले. शौर्याने लढताना मुरारबाजी या युद्धात धारातीर्थी पडले. एकूण स्थिती पाहून मिर्झाराजे स्वराज्याच्या मुख्य भागाकडे घुसला. तर स्थिती बिकट होईल हे ओळखून महाराजांनी तहाची बोलणी सुरु केली. आणि वाटाघाटी अखेर आपल्या मनासारखा तह करून घेतला.
पुरंदरचा तह
हा तह ११ जून १६६५ रोजी झाला. या तहानुसार शिवाजी महाराजांनी मोगलांना २३ किल्ले व चार लाख होणांचे क्षेत्र दिले. हे सारे किल्ले स्वराज्याच्या मुख्य परीघापासून बाहेर होते. चाळीस लाखांची खंडणी हप्त्याने द्यायचे ठरले. त्यात काही जोडकिल्ले होते. त्यामुळे प्रत्यक्षात कमी किल्ले गेले असे इतिहासकार मानतात. या तहानुसार आग्रा भेटही निश्चित झाली. संभाजी राजांना पंचहजारी मनसबदारी कबूल करण्यात आली. स्वत: शिवाजी महाराजांनी मात्र बादशहाची नोकरी नाकारली. तहाच्या अटी पूर्ण होईपर्यंत संभाजी महाराज मिर्झा राजांकडे ओलीस म्हणून राहतील असेही ठरले. पण आग्रा भेटीत महाराजांनी बाणेदारपणे औरंगजेबाचा अवमान केला व सुरक्षित सुटका करून घेतली. स्वत:च्या ताब्यात उरलेल्या १३ गडांच्या जोरावर त्यांनी नंतर पुन्हा गेलेले किल्ले परत मिळवले व बादशहाला मात दिली. पुरंदर तहामुळे स्वराज्य पूर्णपणे गमवायची शक्त्यता निर्माण झाली होती.
हेही वाचा - Narveer Umaji Naik Death Anniversary : ब्रिटिशांविरुद्ध झुंजणारा 'नरवीर उमाजी नाईक'; वाचा सविस्तर...