पुणे - सध्या सुरू असलेल्या पावसाने उत्तर पुणे जिल्ह्यातील नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा परिसरातील पूल पाण्याखाली गेले आहेत, तर दुसरीकडे शिरूर ते कानगाव रस्त्यादरम्यानचा भीमा नदीवरील नव्याने उभारण्यात आलेल्या पूलाचा भराव पुराच्या पाण्यामुळे वाहून गेला आहे. त्यामुळे या पूलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
भीमेच्या महापुरामुळे शिरुर आणि दौंड तालुक्यातील दळणवळणावर मोठा परिणाम झाला आहे. मगळवारी मांडवगण फराटा येथे दोन कांद्याने भरलेले ट्रक पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाले आहे. दरम्यान वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये म्हणून स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने या ठिकाणी मदत कार्य सुरू करण्यात आले आहे.