पुणे - देशात गुजरात आणि महाराष्ट्राचं योगदान हे सहकार क्षेत्रात खूप मोठं आहे. आज सहकार हा विषय देशपातळीवर बघणारे नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे दोघेही गुजरातचे आहेत. अमित शाह तर स्वतः हा अहमदाबाद सहकारी संस्थेचे संचालक होते. ज्या लोकांच्या आयुष्यातील काही कालखंड हे सहकारात गेलं, ते सहकाराला उद्ध्वस्त करू शकत नाहीत, असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं.
साधना सहकारी बँक लि. च्या मुख्य कार्यालयांच्या प्रशासकीय नुतन वास्तूचे उद्घाटन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर पद्मश्री डॉ. सुदाम काटे, विद्याधर अनास्कर, अनिरुद्ध देशपांडे, आमदार चेतन तुपे, दिलीप आबा तुपे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी माजी खासदार विठ्ठलराव तुपे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे देखील अनावरण पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
हेही वाचा - नवीनच गोष्ट...माझ्याही ज्ञानात भर पडली, शरद पवारांचा मोहन भागवत यांना खोचक टोला
- देशात 60 टक्के नागरी बँका गुजरात आणि महाराष्ट्रात-
नागरी बँका आणि सहकारी बँका यांच्यात महाराष्ट्राचं योगदान हे खूप मोठं आहे. देशातील एकंदरीत नागरी बँकांपैकी 60 टक्के नागरी बँका दोन राज्यात आहेत, ते म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यात आणि या दोन राज्यातील बँकांचं कामकाज बघितलं तर खूप चांगलं आहे. सहकारावर श्रद्धा असलेलं मोठं वर्ग या दोन्ही राज्यात आहे. राज्य सहकारी बँकही आशिया खंडातील सर्वात मोठी बँक म्हणून ओळखली जाते, असंही यावेळी पवार यांनी सांगितलं.
- सामान्य माणूस नव्हे तर मोठे व्यक्तीच कर्ज बुडवतात -
सर्वसामान्य नागरिक कधीही कर्ज बुडवत नाही. मोठी माणसेच नेहमी कर्ज बुडवतात. सर्वसामान्य नागरिक हे उशिरा का होईना कर्जाची परतफेड करत असतात. सामान्य माणसाला बँकेचा जेवढा जास्त फायदा होईल, तेवढं जास्त बँक वाढत राहील. सर्वसामान्य नागरिकांचा नेहमीच विचार व्हायला हवं, असं मत यावेळी पद्मश्री डॉ. सुदाम काटे यांनी व्यक्त केलं.
हेही वाचा - डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण : 15 सप्टेंबरला आरोपींवर दोषारोपपत्र दाखल केले जाणार