पुणे - देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रातिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांचे शौर्य हे आजही युवकांना प्रेरणा देते. त्यातीलच एक म्हणजे शहीद राजगुरू. राजगुरू यांनी भगतसिंग आणि सुखदेवसह फासावर जाऊन देशाच्या स्वातंत्र्याबाबतची त्यांची निष्ठा प्रखरतेने दाखवून दिली होती. आजच्या दिवशी 23 मार्च 1931 ला त्यांना फाशी देण्यात आली होती. त्यामुळे, आजचा हा दिवस शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो. शहीद दिनाच्या निमित्ताने राजगुरू यांच्याविषयी जाणून घेऊया.
हेही वाचा - पुणे विमानतळावर 48 लाखांचे एकूण 3 हजार हिरे जप्त, कस्टम विभागाची मोठी कारवाई
कोण होते राजगुरू? - शिवराम राजगुरू हे महान भारतीय स्वातंत्र्यसैनिक होते. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांचे पूर्ण नाव शिवराम हरी राजगुरू असे आहे. 24 ऑगस्ट 1908 रोजी महाराष्ट्रातील खेड येथे त्यांच्या जन्म झाला होता. राजगुरू अवघे सहा वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. खेडमध्ये प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर राजगुरू पुण्यातील न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये गेले. अगदी लहान वयात ते सेवा दलाचे सदस्य झाले. ते पुण्यातील मराठी ब्राह्मण कुटुंबातील होते. लहानपणापासूनच त्यांनी इंग्रजांचे अत्याचार पाहिले होते. यामुळे सुरुवातीचा आंतरिक राग आणि परत लढण्याची ताकद त्यांना मिळाली. त्यांच्या समर्पण आणि देशभक्तीने त्यांना भारतीय क्रांतिकारक बनवले.
राजगुरू हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशनमध्ये सामील झाले. ब्रिटीशांना हुसकावून लावण्यासाठी त्यांनी क्रांतिकारी हिंसाचाराचे समर्थन केले. डॉक्टर हर्डीकर यांच्या सेवा दलामध्ये असतानाच त्यांचा संबंध हा हिंदुस्तान रिपब्लिकन पार्टी या क्रांतिकारी संघटनेशी आला. चंद्रशेखर आझाद, भगत सिंग आणि सुखदेव अशा क्रांतिकारकांच्या सहवासात आल्याने ते सशस्त्र उठाव करण्यास प्रेरित झाले. लाला लजपत राय यांच्यावर जेम्स स्कॉट नावाच्या पोलीस अधिकाऱ्याने लाठीहल्ला केला, त्यात जखमी होऊन ते मरण पावले. लाला लजपत राय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी या तिघांचे लक्ष्य पोलीस अधीक्षक जेम्स स्कॉट होते. १७ फेब्रुवारी १९२८ रोजी राजगुरू, भगतसिंग यांनी लाहोर येथे साँडर्सवर (जेम्स स्कॉट ला मारताना चुकून) गोळ्या घालून त्यांना ठार केले. यामुळे राजगुरू त्यांच्या सहकारी स्वातंत्र्यसैनिकांसह ब्रिटिश अधिकाऱ्याच्या मृत्यूच्या आरोपासाठी दोषी ठरले.
ज्या साम्राज्याचा सूर्य कधीही मावळत नाही, अशा शक्तिशाली ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध धाडस दाखविणाऱ्या तीन महान नायकांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर खटला चालवण्यात आला आणि सॉंडर्सच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवल्यानंतर 23 मार्च 1931 रोजी तिघांना लाहोर तुरुंगात फाशी देण्यात आली. नॅशनल बँकेची लूट, क्रांतिकारक जोगेश चंद्रा चॅटर्जी यांची सुटका यांतही राजगुरूंचा सहभाग होता.
राजगुरूंचे राष्ट्रीय स्मारक भारताच्या पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यातील हुसेनीवाला येथे आहे. या तिघांच्या बलिदानाचा २३ मार्च हा दिवस भारतात शहीद दिन म्हणून पाळण्यात येतो. राजगुरू, भगतसिंग आणि सुखदेव यांना ब्रिटीश राज्याने फाशी दिली. पण, त्यांच्या विचारांचे, देशभक्तीचे, बलिदानाचे स्मरण केले पाहिजे, जेणेकरून वर्तमान आणि भावी पिढ्या त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन राष्ट्र उभारणीत स्वत:ला झोकून देऊ शकतील.
हेही वाचा - National Defense Academy : राष्ट्रीय संरक्षण अकादमीतील मुलींच्या पहिल्या तुकडीचे जून'मध्ये प्रशिक्षण