पुणे - कोरोनाच्या पाश्र्वभूमिवर गेली दोन वर्ष सर्वच सण उत्सव हे निर्बंधात साजरे करावे लागले.पण यंदा निर्बंध मुक्त करण्यात आल्याने सर्व सण उत्सव हे मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.तसेच प्रत्येक कार्यक्रम देखील हे मोठ्या प्रमाणात होत आहे.नुकतच झालेले गणेशोत्सव हे देखील मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले आहे.आणि आत्ता नवरात्र उत्सव देखील मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. श्रीगणेशोत्सवामागोमाग चातुर्मासांत येणारा अतिमहत्त्वाचा 'दुर्गापूजा' म्हणजेच नवदुर्गाचा नवरात्रींचा महोत्सव.( Navratri 2022 ) आकन्या काश्मीर संपूर्ण भारतांतच नव्हे भारताबाहेर सर्वत्र जिथें जिथें भारतीय तिथें तिथें त्या विदेशातून सुद्धा सर्वत्र नवरात्रीचा 'दुर्गापूजा' महोत्सव प्रचण्ड उत्साहाने आणि 'ओतं च प्रोतं च' भक्तिभावाने साजरा होतो.यंदाच्या नवरात्र उत्सवाच्या नऊ दिवसाचे महत्त्व आपण पाहणार आहोत. ( See The Importance Of Nine Days Of Navratri Festival )
अशी करावी घटस्थापना - ओल्या मातीचा छोटा चौकोनी ओटा 'वेदी' करून त्यावर एका मातीच्या, सोन्या-चांदीच्या वा मातीच्या कलशाची स्थापना करून त्यावर देवतेची स्थापना अश्विन शुक्ल प्रतिपदेला करायवी. हीच घटस्थापना.( Ghatasthapana 2022 ) कलशाखालील ओल्या मातीच्या त्या ओट्यावर नवधान्यांची पेरणी करून रोज थोडे पाणी शिंपडायचे. ताबडतोब त्याला लुसलुशीत कोंब फुटतात. भविष्यांतील भरघोस कृषींचें-शेतीचें हे सूचक प्रसाद चिह्न. नवरात्रीचे नऊ दिवस ( Importance of nine days ) या घटावर रोज एकेक माळ-नवदुर्गासाठी सोडायची. हाच नवरात्राचा शुभारंभ. आपल्या वैभव समृद्धीचा सूचक.
पहिला दिवस - वन्दे वाञ्छितलाभाय चन्द्रार्ध-कृत-शेखराम्। वृषारूढां शूलधरां शैलपुत्रीं यशस्विनीम् ॥ आज आश्विन शुद्ध प्रतिपदा. घटस्थापनेचा नवरात्र महोत्सवातील पहिला दिवस. या दिवशी नवरात्र महोत्सवामधील पूजनीय अशा नवदुर्गापैकी पहिल्या दुर्गादेवतेचे शैलपुत्रीचे पूजन करायचे. पर्वतराज हिमालयाची कन्या म्हणून हिचे नांव 'शैलपुत्री' पार्वती. वृषभ (बैल)वाहन(वृषारूढाम् ) असणाऱ्या दुर्गामातेच्या उजव्या हातांत त्रिशूल आहे (शूलधराम्). डाव्या हातात कमळ आहे. हिच्या मस्तकावर चन्द्रकोरआहे (चन्द्रार्ध - कृत - शेखराम्). माझ्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी (वाञ्छित-लाभाय ) सदैव यशस्वी असणाऱ्या (यशस्विनीम्) या शैलपुत्रीला-प्र -प्रथम दुर्गामाता स्वरूपाला मी भक्तिभावाने प्रणाम करतो (वन्दे). योगी उपासनेचा प्रारम्भ आज आपल्या मनाला मूलाधारचक्रात स्थिर करून शैलपुत्री दुर्गामातेच्या पूजनाने करतात. आजची माळ पहिली. आज लावलेला नंदादीप अखंड ठेवायचा.
दुसरा दिवस - दधाना करपद्माभ्याम् अक्ष माला-कमण्डलू । देवी प्रसीदतु मयि ब्रह्मचारिणी अनुत्तमा ।। आश्विनशुद्ध द्वितीया हा नवरात्र महोत्सवाचा दुसरा दिवस. आज नवरात्राची दुसरी माळ. आज नवदुर्गापैकी दुसऱ्या दुर्गास्वरूपाचे 'माता ब्रह्मचारिणी' देवीचे पूजन करायचे. ब्रह्मचारिणी या शब्दातील ब्रह्म म्हणजेच तपश्चर्या. तपस्या करणारी तपस्विनी दुर्गामाता अत्यन्त भव्य अशा ज्योतिर्मय स्वरूपात भक्तांना दर्शन देते. “उजव्या हातात जपमाला आणि डाव्या हातात कमण्डलू धारण करणारी (कर-पद्माभ्याम् अक्षमाला-कमण्डलू दधाना) सर्वोत्तमा ब्रह्मचारिणी दुर्गामाता (माझ्या उपासनेने) प्रसन्न होवो.”योगोपासक साधकांचे मन आज स्वाधिष्ठान चक्रात स्थिर करायचे. त्यांना देवीची कृपा होतेच. अशी प्रार्थना करायची.
दिवस तिसरा - पिण्डज-प्रवरारूढा चण्डकोपास्त्रकैर् युता । प्रसादं तनुते मह्यं चन्द्रघण्टा इति विश्रुता ।। आज आश्विन शुद्ध तृतीया. नवरात्र महोत्सवातील नवदुर्गा मातेच्या उपासना-पूजनाचा तिसरी माळ अर्पण करायचा दिवस. दुर्गामातेच्या तिसऱ्या शक्तीचे नाव चन्द्रघण्टा. तिच्या मस्तकावर घण्टेच्या आकाराचा अर्थ चन्द्र आहे. म्हणून तिच्या आजच्या स्वरूपाचे नांव आहे. चन्द्र-घण्टा. याच नावाने आज तिचे पूजन. आजचे तिचे स्वरूप अतिशय शान्तिप्रद आणि कल्याणकारक असते. हिच्या शरीराचा वर्ण सुवर्णासारखी चकचकीत चमक असणारा. ही दशभुजा असून तिच्या दहा हातांत खड्ग वाण इत्यादी शस्त्रे आणि अस्त्रे धारण केलेली आहेत. (चण्डक-उपास्त्रकैर् युता) ती सिंहवाहिनी आहे. तिची मुद्रा युद्धासाठी सज्ज असल्याचा भाव दाखविते. ती मला प्रसन्न होऊन प्रसादाची कृपा करणारी ठरो. हिची उपासना करणारा योगी मणिपूरचक्रात प्रवेश करतो. दिव्य सुगन्ध आणि दिव्य ध्वनि यांचा त्याला लाभ होते.
दिवस चौथा - सुरा - संपूर्ण कलशं रुधिराप्लुतम् एव च । दधाना हस्त-पद्माभ्यां कूष्माण्डा शुभदाऽस्तु मे । आश्विन शुद्ध चतुर्थी. हा नवरात्राच्या चौथ्या माळेचा दिवस. आजच्या दुर्गामातेचे नांव कूष्माण्डा. कूष्माण्ड (मराठीतील अर्थ कोहळा ). चण्डीहोमात बलिदान (आहुती) करतांना देवीला कूष्मांडाचा कोहळ्याचा हविर्भाग खूपच आवडतो. म्हणूनच म्हणतात तिला कूष्माण्डा. ही सृष्टीची आदिस्वरूप शक्ति आहे. तिनेंच ब्रह्माण्डाची रचना केली. हिचा निवास सूर्य-मंडलाच्या आतील लोकांत असतो. कूष्माण्डा देवीची या दुर्गेची शरीर-कान्ति अन् प्रभा सूर्याप्रमाणेच देदीप्यमान. तिच्यामुळेंच दहा दिशा प्रकाशमान होतात. ही अष्टभुजा आहे.
दिवस पाचवा - सिंहासनगता नित्यं पद्माश्रित- कर-द्वया। शुभदा अस्तु सदा देवी स्कन्दमाता यशस्विनी।। आश्विनशुद्ध (ललिता) पञ्चमीच्या दुर्गामातेचे नांव आहे स्कन्दमाता. भगवान् स्कन्द म्हणजेच कार्तिककुमार. कुमार कार्तिकेय या श्रीगणेशाच्या बन्धूची माता म्हणून आजच्या दुर्गामातेचे नाव स्कन्द माता. षण्मुख स्कन्दाला मांडीवर घेऊन बसलेली चतुर्भुजा, सिंहवाहिनी, डाव्या उजव्या वरच्या हातात कमळ तर खालचा डावा हात वर मुद्रा आहे. हिचा वर्ण पूर्ण- शुभ्र आहे. काही ठिकाणी ही पद्मासना असते. आपल्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी स्कन्दमाता दुर्गादेवी अनेक योगसाधकांची तपस्येची देवता आहे. बाह्य क्रिया चित्तवृत्तींचा लोप करून विशुद्ध चक्र स्थिरावस्थेत या देवीची उपासना परमसुख, शान्तीचा लाभ करून देते. ललितापञ्चमी म्हणून ललितासहस्त्रनाम स्तोत्रपाठाने आज केलेले हिचे कुंकुमार्चन सौभाग्य वैभव वर्धक असते. कोल्हापूरनगराबाहेर पूर्वेला आज त्र्यम्बुली (टेंबलाई) देवीला श्री महालक्ष्मी भेटायला जाते. तिथेहि मोठी जत्रा भरते. हा नवरात्रातील महत्त्वाचा दिवस.
दिवस सहावा - चन्द्रहासोज्ज्वल-करा शार्दूल- वर-वाहना। कात्यायनी शुभं दद्याद् देवी दानव-घातिनी ।। आश्विन शुद्ध षष्ठीचे दुर्गामातेचे सहावे रूप कात्यायनी या नावाने प्रसिध्द आहे. कत महर्षीचा पुत्र कात्य. याच्याच गोत्रात महर्षि कात्यायन झाले. हे भगवती पराम्बेचे निष्ठावंत उपासक. यांच्याच कठोर तपस्येने देवीने यांच्या पोटी कन्यारूपाने जन्म घेतला, म्हणून हिचे नांव कात्यायनी. आश्विन चतुर्थीच्या दिवशी हिचा जन्म. शुक्लसप्तमी, अष्टमी, नवमीला कात्यायन-ऋषींनी हिचे पूजन केल्यावर दशमीला हिने महिषासुर राक्षसाचा वध केला आणि तिचे नाव झाले महिषासुरमर्दिनी, सोन्या सारखा हिचा वर्ण चकचकीत, भव्य दिव्य स्वरूप. चतुर्भुजा असून उजवा वरचा हात अभय-मुद्रा. खालचा वरमुद्रा. डाव्या खालच्या हातात खड्ग, वरच्या हातात कमळ असून ही सिंहवाहिनी आहे. साधक हिची उपासना आज्ञाचक्र स्थिरावस्थेत करतात. धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चार पुरुषार्थांची प्राप्ति हिच्या उपासने मुळे साधकाला होते. आज दुर्गामातेच्या सहाव्या माळेचा दिवस.
दिवस सातवा - एकवेणी जपा कर्ण-पूरा नाम खर-स्थिता। लम्बोष्ठी कर्णिका कर्णी तैलाभ्यक्त-शरीरिणी।। वामपादोल्लसत्-लोह - लता - कण्टक- भूषणा । वर्धन-मूर्ध-ध्वजा कृष्णा कालरात्रिर भयंकरी।। आश्विन शुद्ध सप्तमीचे नवरात्रीच्या सातव्या दिवसाचे दुर्गामातेचे रूप सर्वात भयंकर, भीतीने थरकाप उडविणारे, अंधारासारखे काळेकभिन्न. गळ्यात विजेसारखी चमकणारी माला. पिंजारलेले केस. ब्रह्मांडासारखे भेदक गोल तीन डोळे. श्वासातून भयंकर अग्निज्वाला बाहेर पडताना भयभीत करतात. गाढव हे हिचे वाहन. उजवा वरचा हात वर-मुद्रा, खालचा अभय-मुद्रा. डाव्या हातात वरच्या हातात लोखंडी काटा, खालच्या हातांत खड्ग. भीतीने गाळण उडवून देणारे स्वरूप असले तरी हि दुर्गा कालरात्री उपासकांना सर्वोत्तम फळ देणारी आहे. ही देवता दानव, दैत्य, राक्षस, भूत, प्रेत, पिशाच्च यांच्या सर्व बाधा दूर करणारी, त्यांचा विनाश करणारी आहे. ती केवळ भयंकरी नव्हे तर शुभ फल देणारी शुभंकरीहि आहे. अक्षय पुण्य देणारी आहे. या देवीला आज सातवी माळ.
दिवस आठवा - श्वेते वृषे समारूढा श्वेताम्बर-धरा शुचिः । महागौरी शुभं दद्यात् महादेव-प्रमोददा ।। नवरात्र महोत्सवाचा सर्वात महत्त्वाचा आश्विनशुद्ध अष्टमीचा दिवस. आठव्या शक्तीचे नांव महागौरी. महागौरी दुर्गामाता शंख, चन्द्र किंवा कुन्द-पुष्पाप्रमाणे नितान्त रमणीय, प्रसन्नदर्शन अशा गौरकान्तीची आहे. हिचे वय ८. 'अष्टवर्षा भवेद् गौरी ।' या वचनाप्रमाणे यामुळे नव कुमारिका-पूजनात आज ८ वर्षाच्या कुमारी बालिकेचे महागौरी म्हणून पूजन करायचे. ही वृषभ (बैल) वाहना असून हिच्या चतुर्भुजापैकी उजव्या दोन हातात त्रिशूल आणि अभय मुद्रा तर डाव्या दोन हातात डमरू आणि वरप्रसाद-मुद्रा आहे. हिची मुद्रा नितांत शान्त. हिची शक्ति अमोघ, ताबडतोब फल देणारी आहे. चित्तपावनांची घटाध्मान (घागरी फुंकणे) ही खास महालक्ष्मी पूजा या अष्टमीलाच असते. पूर्व संचित पापांचा नाश भविष्यातील दैन्य-दुःख पळवून लावण्याचे फलित हिच्या उपासनेने भक्ताला प्राप्त होते. आजची माळ आठवी.
दिवस नववा - सिद्ध-गन्धर्व-यक्षाद्यैर् असुरैर् अमरैर् अपि सेव्यमाना सदा भूयात् सिद्धिदा सिद्धिदायिनी।। नवरात्रातील शेवटचा नववा दिवस महानवमी. हिलाच खण्डेनवमी शस्त्र-पूजनाचा दिवस म्हणतात. दुर्गामातेची ही नववी शक्ति सिद्धिदा. सर्व प्रकारच्या १८ सिद्धी उपासकाला मिळवून देणारी म्हणून ही सिद्धिदात्री. ही सिंहवाहिनी अथवा कमलासना या दोन्ही स्वरूपात असते. हिच्या चार हातात गदा, चक्र, शंख आणि कमळ असते. जगांवर पूर्ण विजय प्राप्त करून देणारी, अमृतत्वाकडे घेऊन जाणारी ही नवमीची दुर्गा देवी सर्व सुखदात्री, मोक्षदायिनी म्हणून सर्वप्रिय आहे. या देवीच्या उपासनेने नवव्या माळेने घटस्थापने पासून आश्विनशुद्ध प्रतिपदा ते नवमी असे नऊ दिवस चालू असणाऱ्या नवरात्रिमहोत्सवाची सांगता होते. परंतु खरा महोत्सव संपतो मात्र विजया दशमीचा दसरा करूनच.