पुणे - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे आयुक्त म्हणून संदीप बिश्नोई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज (शुक्रवारी) बिष्णोई यांच्या नियुक्तीचे आदेश गृह विभागाकडून काढण्यात आले. बिष्णोई हे पिंपरी-चिंचवडचे दुसरे आयुक्त ठरणार आहेत. याआधी आर. के. पद्मनाभन यांनी याठिकाणी पहिले आयुक्त म्हणून काम पाहिले आहे.
हेही वाचा - पुण्यात पोलिसांनी जप्त केले 371 बेकायदेशीर कोयते
पद्मनाभन यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या निवृत्तीला काही दिवसांचा कालावधी राहिला होता. मात्र, निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे ही बदली करण्यात आली आहे. त्यांना अद्याप पदस्थापना देण्यात आली नाही. पद्मनाभन यांनी पिंपरी-चिंचवडमधील नागरिक आणि पत्रकार मंडळीनी खूप साथ दिली, असे म्हणत शहरातील अनेक समस्या आणि गुन्हेगारीच्या घटना रोखण्यात यश आले असल्याचे मत व्यक्त केले.
संदीप बिश्नोई यांचा परिचय
पिंपरी-चिंचवडचे नवीन पोलीस आयुक्त संदीप बिश्नोई यांचे शिक्षण बीए, एल.एल.बी पर्यंत झाले आहे. 1989 च्या बॅचचे ते आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी आत्तापर्यंत अनेक ठिकाणी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. एस.आर.पी.एफ व महामार्ग वाहतूकचे अप्पर पोलीस महासंचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. त्यामुळे बिश्नोई शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर कसे नियंत्रण ठेवणार याबाबत पिंपरी-चिंचवडकरांमध्ये उत्सुकता आहे.