पुणे - औरंगाबाद शहराच्या नामांतरावरून राजकारण पेटलेले असतानाच आता पुणे शहराचे नाव बदलण्याची मागणी पुढे येत आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी ही मागणी केली आहे. पुणे शहराच्या नामांतराचा मुद्दा हा जुनाच असून औरंगाबादच्या प्रकरणानंतर हा मुद्दा पुन्हा एकदा नव्याने समोर आला आहे. राष्ट्रमाता जिजाऊंनी बेचिराख झालेल्या पुण्याला वसवलं. त्या पुण्याला जिजाऊंचे नाव देऊन पुण्याचे 'जिजापूर' असे नामांतर करून टाका असे संतोष शिंदे म्हणाले.
पुणे जिल्हा छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतीक-
शिंदे म्हणाले, शिवनेरी पासून लाल महाल पर्यंत आणि पुरंदर पासून तोरणा, राजगड, सिंहगड, विसापूर, लोहगड, राजमाची, विचित्रगड ते स्वराज्याची शपथ घेतलेल्या रायरेश्वर पर्यंत सह्याद्री ओरडून ओरडून कर्तुत्व आणि पराक्रमाचा इतिहास सांगत आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतीक आपला पुणे जिल्हा आहे. राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतीक आहे. पुण्यात राष्ट्रमाता जिजाऊंनी 'बाल शिवबा'ला घेऊन सोन्याचा नांगर चालवून पुणे वसवलं, त्या पुण्याचं आज सोनं झालेले आहे, असे संतोष शिंदे म्हणाले.
इतिहासातील प्रतिकांचा आदर करा-
नामांतराचे गलिच्छ राजकारणाचा करू नका. इतिहासातील प्रतिकांचा आदर करा. थोरात साहेब, टिळक वाड्यात बसून छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास कळणार आणि पचणार नाही. आमचा वारसा आम्हाला अजून गौरवपुर्वक चालवू द्या, म्हणून पुण्याला 'जिजापुर' हे नाव द्या, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी केली आहे.
औरंगाबादच्या नामांतराची देखील मागणी-
भाजप सध्या औरंगाबादचे नाव बदलण्यासाठी आक्रमक झाली आहे.औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करावे, अशी मागणी शिवसेनेची नेहमी राहिली आहे. दरम्यान, महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नामांतरचा वाद पुन्हा चिघडला आहे. यावरून सत्तेत असलेले शिवसेना आणि कॉंगेस आमने-सामने आले आहेत.
हेही वाचा- ..तर २६ जानेवारीला दिल्लीमध्ये 'ट्रॅक्टर परेड' होईल; आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचा इशारा