पुणे - गेल्या अनेक वर्षांपासून बैलगाडा शर्यतीवर बंदी आहे. यामुळे गावांतील जत्रांमधील आनंद हरपून गेला होता. मात्र, आंबेगाव तालुक्यातील साकोरे गावात तरुणांनी स्वत: बैल बनून बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. यामध्ये लहान मुले आणि तरुणांनी उस्फूर्त सहभाग नोंदवला होता.
साकोरे गावात म्हस्कोबा महाराज उत्सवानिमित्त पंचरत्न युवा मंचाच्यावतीने तरुणांच्या बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या शर्यतीत तरुणांचे ३५ गाडे धावले. या शर्यतीमध्ये बैलांप्रमाणे तरुणांनी शर्यत केली. त्यामुळे बैलगाडा शर्यतीवर बंदी असताना अशाप्रकारे आयोजित केलेल्या या शर्यतीची सर्वत्र चर्चा चालू आहे.
सध्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शाळांना सुट्टी लागली आहे. त्यामुळे तरुण मुलांनी जत्रेत बैलगाडा शर्यतबंदी असली तरी आम्ही स्वतः बैल बनवून ही शर्यत भरवली आहे. बैलगाडा शर्यतीबंदीबाबत न्यायालय, सरकारकडून योग्य निर्णय घेतला जात नाही, त्याच्या निषेधार्त तरुणांचे व चिमुकल्या मुलांचे बैलगाडे पळविले असल्याचे साकोरे गावातील तरुणांनी सांगितले.
बैलगाडा शर्यतीवर न्यायालयाने बंदी घातल्यामुळे गावोगावच्या यात्रा आणि उरुस ओस पडू लागले आहेत. प्रेक्षकांनी भरलेला बैलगाडा घाट जिद्दीने धावणारी बैलजोडी, त्यांचा मागे धावणारी मंडळी असे चित्र बैलगाडा शर्यत बंदीनंतर आता इतिहासकालीन झाले आहे.