पुणे - कथित एक ऑडियो क्लिप व्हायरल होत असून त्यामध्ये पुणे महापालिकेतील एका महिला अधिकाऱ्याला फोनवरून शिवीगाळ करण्यात येत आहे. त्यांच्याकडील एका कामासंदर्भात एक व्यक्ती मोबाईलवरून त्यांच्याशी संपर्क करतो. यावेळी संबंधित महिला अधिकाऱ्याने काही वरीष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागेल असे सांगितले. त्यावर चिडलेले व्यक्ती या महिला अधिकाऱ्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याची ही कथित ऑडियो क्लिप आहे. या ऑडिओ क्लिपमधील शिवीगाळ करणारे व्यक्ती हे कथितरित्या भाजप आमदार सुनील कांबळे असल्याचा आरोप केला जात आहे. यावरून विविध नेत्यांनी भाजपासह आमदार सुनील कांबळे यांच्यावर घणाघात केला आहे.
असंस्कृतपणाचे कमळ भाजपाच्या चिखलातच उगवणार - रुपाली चाकणकर
भारतीय जनता पार्टीचे आमदार सुनील कांबळे यांनी सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत. ठेकेदाराने न केलेल्या कामांची बिले काढण्यासाठी पुणे महापालिकेच्या महिला कार्यकारी अभियंत्यांना त्यांच्या आई बहिणीवरून शिवीगाळ करणे अतिशय संतापजनक आहे. पुणे महापालिकेत आपली सत्ता आहे. आपण आमदार आहेत, त्याचा रुबाब आपल्या घरी आपण दाखवावा. पालिका अधिकाऱ्यांवर नाही. पालिका अधिकारी हे तुमचे कार्यकर्ते नाहीत. आमदार सुनिल कांबळे हे ज्या पद्धतीने महिलांना बोलले आहे. त्या अर्थाने एक समजत आहे की, भाजपाच्या असंस्कृतपणाच्या चिखलातच अश्याच पद्धतीची कमळं उगवणार आहेत. कारण त्यांची मातृसंस्था असलेल्या आरएसएसचे हे संस्कार आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केली आहे.
अर्वाच्य भाषेत बोलताना लाज कशी वाटली नाही - संगिता तिवारी
अर्वाच्य भाषेत महिलेला लज्जा येईल अशा शिव्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये दिल्या आहेत. या शिव्या आपण त्या महिला अधिकाऱ्याला नाही तर तुम्ही मातृत्व शक्तीला दिल्या आहेत. पुण्यातील सर्व स्त्रीया तुमच्या घरासमोर येऊन आंदोलन करतील. मी स्वतः देखील तुमच्यावर गुन्हा दाखल करणार आहे. तुम्हाला असे अर्वाच्य भाषेत बोलताना लाज कशी वाटली नाही, अशी टिका कॉंग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश महिला सरचिटणीस संगिता तिवारी यांनी केली आहे.
संबंधितावर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी - प्रवीण देशमुख
आमची राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने मागणी आहे की, त्या कथित ऑडिओ क्लिपची चौकशी व्हावी आणि यामध्ये जी कोणी व्यक्ती आहे तिच्यावर कठोरातील कठोर कारवाई करावी. त्या महिला अधिकाऱ्यांना सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रवीण देशमुख यांनी केली आहे.
ती क्लिप माझी नाही, माझ्याविरोधात हे विरोधकांचे षडयंत्र - सुनील कांबळे
महापालिकेच्या एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या प्रकरणावर आमदार सुनील कांबळे यांनी खुलासा करत म्हणाले की, मुळात जी क्लिप व्हायरल होत आहे ती माझी नसून मोडतोड करून जोडण्यात आली आहे. गेल्या 25 वर्षापासून सर्वसामान्य माणसांमध्ये काम करणारा मी सामान्य कार्यकर्ता आहे. येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीला विरोधकांना काही मिळत नसल्याने आणि माझ्या विरोधात लढण जड जाणार असल्याने त्यांनी केलेले हे षडयंत्र आहे, असा खुलासा भाजपा आमदार सुनील कांबळे यांनी केला आहे.
हेही वाचा - ती क्लिप माझी नाही, मोडतोड करून बनवलेली, माझ्याविरोधात हे विरोधकांचे षडयंत्र - सुनील कांबळे
हेही वाचा - असंस्कृतपणाचे कमळ भाजपाच्या चिखलातच उगवणार, रुपाली चाकणकर यांची टीका