पुणे - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी रूपाली चाकणकर यांची नवीन महिला प्रदेश अध्यक्ष म्हणून निवड केल्याचे जाहीर केले. रूपाली चाकणकर या पुण्यातील महिला आघाडीच्या माजी अध्यक्षा आहेत.
केलेल्या चांगल्या कामाची पावती म्हणूनच पद - रूपाली चाकणकर
रूपाली चाकणकर यांनी पक्षाचे आभार मानले. पुणे शहरात केलेल्या चांगल्या कामाची पावती म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाल्याचे मत रूपाली चाकणकर यांनी व्यक्त केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या केंद्रीय महिला अध्यक्ष फौजिया खान यांनी रुपाली चाकणकर यांना नियुक्तीचे पत्र दिले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा चित्रा वाघ यांनी राजीनामा दिल्यानंतर रूपाली चाकणकर यांची तातडीने त्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वांना सोबत घेऊन काम करणार, असा विश्वास चाकणकर यांनी यावेळी व्यक्त केला.
देशभरात भाजप स्वच्छता करत आहे, वाघ यांच्यानिमित्ताने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला स्वच्छ केले - विद्या चव्हाण
यावेळी बोलताना पक्षाच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण यांनी चित्रा वाघ यांच्यावर जोरदार टीका केली आहे. गेल्या एक वर्षापासून चित्रा वाघ यांना या पदावरून हटवण्याची मागणी महिला करत होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस स्वच्छ करण्याचे काम भाजपने आता केले आहे. देशभरात भाजप स्वच्छता करत आहे. वाघ यांच्या निमित्ताने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला स्वच्छ केले आहे, अशी बोचरी टीका विद्या चव्हाण यांनी यावेळी केली.
शनिवारी पुण्यामध्ये रूपाली चाकणकर यांचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रवक्त्या विद्या चव्हाण, खासदार वंदना चव्हाण यांनी स्वागत केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी चाकणकर यांची महिला प्रदेश अध्यक्ष म्हणून निवड केल्याचे जाहीर केले.