पुणे - पुणे पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने ( Anti-drug squad Pune ) कोथरूड परिसरातून अमली पदार्थाची तस्करी ( Drug trafficking in Kothrud ) करणाऱ्या एका दाम्पत्याला ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून तब्बल साडे तेरा लाख रुपये किमतीचे चरस आणि एमडी हे अमली पदार्थ जप्त ( Drugs Worth Rs 13.5 Lakh Seized ) करण्यात आले. याप्रकरणी मोहम्मदअफजल अब्दुल सत्तार नागोरी (वय ४०, रा. मुंबई) आणि पत्नी शबाना मोहम्मदअफजल नागोरी (वय ३८) यांना अटक करण्यात अली आहे. याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात ( Kothrud Police Station ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तस्करीसाठी कुटुंबाचा वापर
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, पुणे अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक विनायक गायकवाड हे कोथरूड परिसरात गस्त घालत असताना त्यांना एक संशयित होंडा सिटी कार उभी असल्याचे निदर्शनास आले. या कारमध्ये सहा वर्षाच्या चमकलीसह महिला बसल्याचे दिसून आले. परंतु त्यांच्यासोबत आलेला व्यक्ती पोलीसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार समजाच त्याच्याकडे विचारपूस केली. त्यावेळी त्याने कुटुंबासोबत आल्याचे सांगितले. तरीही पोलीसांना संशय आला. त्यामुळे त्यांनी मोहम्मदअफजल याची चौकशी करत त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ ८ लाख ४० हजार रुपयांचा एमडी हा अमली पदार्थ मिळून आला. त्याला ताब्यात घेत त्याची पत्नी शबाना हिच्याकडे चौकशी केल्यानंतर तिच्याकडे ५ लाख रुपयांचा चरस मिळून आले. त्यानंतर पोलीसांनी त्यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. मोहम्मदअफजल याला यापूर्वी पुणे पोलिसांनी अमली पदार्थ तस्करी प्रकरणी अटक केली होती. त्यानंतर तो दोन महिने जेलमध्ये होता. त्याच्यावर यापूर्वीचे गुन्हे दाखल आहेत.
मुलीला आजीकडे सोपवले
मोहम्मदअफजल याने अमली पदार्थ तस्करी करताना मुद्दामून आपल्या मुलीला आणि पत्नीला सोबत ठेवले होते. यामुळे पोलिसांना संशय येणार नाही, असे त्याला वाटत होते. त्याला अटक झाली तेव्हा तो त्याच्या सहा वर्षाच्या मुलीला घेऊन पुण्यात आला होता. अटकेच्या वेळी मुलीने हंबरडा फोडला त्यामुळे पोलिसांकडून मुंबईला असलेल्या आजीला संपर्क करून मुलीला आजीच्या स्वाधीन केले. त्यानंतर या दोघांना अटक केली आहे.
हेही वाचा - Whale trafficking - मुंबईत 15 कोटींच्या अंबरग्रीससह, 1 आरोपीला अटक.