पुणे - दीड वर्षापूर्वी पुणे पोलीस दलातून सेवानिवृत्त झालेल्या सहाय्यक पोलीस आयुक्तांचा कोरोना मुळे मृत्यू झाला. बाजीराव मोहिते (वय 61) असे या पोलीस अधिकाऱ्याचे नाव होते. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.
बाजीराव मोहिते हे दीड वर्षापूर्वी कोथरुड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त असताना सेवानिवृत्त झाले होते. अत्यंत मनमिळावू आणि कामात चपळ अशी त्यांची पोलिस दलात ओळख होती. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच आज त्यांची प्राणज्योत मालवली.
पुणे शहर पोलीस दलातूनच मोहिते यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली होती. सर्वप्रथम येरवडा पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक म्हणून त्यांची पोस्टिंग झाली होती. त्यानंतर त्यांनी पुण्यासह मुंबई आणि महाराष्ट्राच्या इतर भागातही काम केले. त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांच्या निधनाने पोलीस दलातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा - दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी शिवकुमार अटकेत