पुणे- महापालिकेचे महापौर आणि शिवसेना गटनेत्याच्या कार्यालयाच्या नुतनीकरणावर लाखो रुपयांची उधळपट्टी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या कार्यालयाच्या कामावर काही दिवसांपूर्वीच लाखो रुपये खर्च करण्यात आला होता. मात्र असं असतानाही पुन्हा एकदा ही उधळपट्टी सुरू आहे. विशेष म्हणजे वास्तुदोष दूर करण्यासाठी नुतनीकरण सुरू असल्याचे समोर आले आहे. या उधळपट्टीवर विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनी मात्र जोरदार टीका केली. या कामासाठी लागणारा खर्च महापौर आणि सेना गटनेत्यांकडून वसूल करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
महापालिकेच्या नविन विस्तारीत इमारतीत सर्व राजकीय पक्षांना कार्यालये देण्यात आली आहेत. त्यात शिवसेनेला मिळालेल्या पक्ष कार्यालयात तत्कालीन गटनेते संजय भोसले यांनी लाखो रुपयांचे फर्निचर करुन घेतले होते. इतर पक्ष कार्यालयांपेक्षा या कार्यालयाची वेगळी सजावट भोसले यांनी करुन घेतली होती. जवळपास दोन-अडीच महिन्यांपूर्वीच या कार्यालयात बसण्यास त्यांनी सुरुवात केली होती. मात्र, आता त्यांचे गटनेतेपद जाऊन सेनेकडून नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांना गटनेतेपद देण्यात आले आहे.
गत आठवड्यात सुतार यांनी गटनेतेपदाची जबाबदारी घेतली. त्यानंतर त्यांनी लगेचच पक्ष कार्यालयातील यापूर्वी केलेल्या कामात बदल करुन नविन काम हाती घेतले आहे. त्यात कार्यालयाच्या दरवाजाची दिशा बदलण्यात येत असून अंतर्गत फर्निचरचे कामाचा समावेश आहे. कार्यालयात याआधी करण्यात आलेल्या फर्निचरवरचा खर्च वाया गेला आहे. त्याचबरोबर दरवाजा बदलण्याचा खर्चही पालिकेच्याच माथी पडला असल्याचा आरोप बराटे यांनी केला आहे.