पुणे - गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेमध्ये कोरोना आढावा बैठक ( Corona Review Meeting ) पार पडली. गेले आठ दिवसांत चौपटीने कोरोना रुग्णसंख्या वाढली असून एकूण जवळपास दररोज ८० ते ८५ टक्के दोन्ही डोस घेतलेले लोक कोरोनाबाधित आहे. मात्र त्यांना सौम्य लक्षणे आहेत. शहरातील २५०० कोरोना रुग्णापैकी ३४६ रुग्ण हॉस्पिटलमध्ये आहेत. इतर रुग्ण घरीच उपचार घेत आहे. सध्या ४ हजार रेमडेसिवीर औषधे शिल्लक आहेत. १८०० बेड उपलब्ध आहेत तर ऑक्सिजन साठा देखील मुबलक प्रमाणात असल्याची प्रतिक्रिया महापौर मुरलीधर मोहोळ ( Mayor Muralidhar Mohol ) यांनी दिली आहे.
कोरोनाचा धोका लक्षात घेता जम्बो हॉस्पिटलमध्येही तयारी सुरु आहे. ऑक्सिजन बेड आणि हॉस्पिटलची संख्या वाढवू शकतो. आता नियम कडक पाळण्याची सूचना दिली गेली आहे. शिवाय निर्बंध कडक करावे लागतील, असेही मोहोळ म्हणाले. ५ ते १८ वयोगटातील लसीकरण सुरू केले असून आज २ लाख मुलांना ७८ हजार डोस देत आहोत. उद्या पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक होणार त्यात अजून नवीन काही नियम निर्णय होतील. शाळा ऑनलाईन करण्याबाबत निर्णय घेण्यासाठी पालकांची भूमिका आम्ही विचारात घेत आहेत, असेही महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.