पुणे - विधानसभा निवडणुकीमध्ये रिपाइं बॅलेट पेपरद्वारे निवडणूक लढायला सज्ज आहे, अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी दिली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची राजकीय भूमिका मांडण्यासाठी पुण्यामध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रामदास आठवले बोलत होते.
यावेळी आठवले म्हणाले, की महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या जागा वाटपामध्ये रिपाइंला 10 जागा मिळतील, अशी अपेक्षा आहे. यामध्ये पुण्यातील पिंपरी आणि कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.
ईव्हीएम मशीनला होत असलेल्या विरोधाबद्दल आठवले म्हणाले, की ईव्हीएम मशीन ही काँग्रेसच्या काळात आली होती. सध्या मतदारांनी भारतीय जनता पक्षाला मतदान केले आहे. त्यामुळे विरोधक ईव्हीएमच्या विरोधात बोलत आहेत. त्याप्रमाणेच राज ठाकरे यांना दुसरा उद्योग उरलेला नाही. त्यांनी ईव्हीएम मशीनच्या विरुद्ध प्रचार करण्यापेक्षा आमच्या विरुद्ध प्रचार करावा, असा सल्लाही त्यांनी राज ठाकरेंना दिला.
वंचित बहुजन आघाडी संदर्भात आठवले म्हणाले, की प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होण्याची शक्यता कमी आहे. त्याप्रमाणेच बहुजन आघाडी मधील अनेक नेते रिपब्लिकन पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्याला भेटत असल्याचे देखील आठवले यांनी यावेळी सांगितले.