पुणे - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाजनादेश यात्रा काढणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आव्हान दिले आहे. ज्या-ज्या भागातून ही यात्रा जाईल त्याच मार्गावर राजू शेट्टी आक्रोश यात्रा काढणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रेत स्वाभिमानीच्या अकरा प्रश्नांची उत्तरे द्यावीत, अन्यथा अकरा दिवसानंतर मुख्यमंत्र्यांच्या मार्गाने आक्रोश यात्रा काढणार असल्याचे राजू शेट्टींनी सांगितले आहे. पुण्यात ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
सिंचन आणि सहकारी साखर कारखान्यांच्या घोटाळ्या प्रकरणी मुख्यमंत्री गाडीभर पुरावे घेऊन गेले. मात्र, घोटाळेबाज मोकाट असून काहींना भाजपात घेतले तर काहींना आयकर आणि ईडीची भीती दाखवत असल्याचा आरोप शेट्टींनी केला. काही जण भाजपात गेले आहेत तर काही अजून भाजप येणार असल्याने कारवाई होत नसल्याचा आरोप शेट्टीं यांनी केला आहे.
शेट्टींचा विधानसभा न लढण्याचा निर्णय
यावेळी आघाडीवर बोलताना शेट्टी म्हणाले, आम्ही 50 जागांची यादी केली आहे. मात्र, कमीत कमी जागा लढवून जास्त जागा निवडून आणणार आहोत. तसेच मी विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचेही शेट्टी यांनी जाहीर केले. राज्यात सध्या मुख्यमंत्री, आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादीची यात्रा आहे. त्यात आता स्वाभिमानीची ही भर पडणार आहे.
राजू शेट्टींनी मुख्यमंत्र्यांना विचारलेले ११ प्रश्न
1) राज्यातील बिल्डरांकडून बांधकाम कल्याणकारी मंडळाकडे दहा हजार कोटींच्या ठेवी जमा झाल्या आहेत. त्यातील तुम्ही किती पैसे खर्च केले आणि त्यामधून कुणाचे कल्याण झाले? काळ्या यादीतील ठेकेदारांना काम मिळाली. कामगारांची संख्या केवळ कागदावर असून बांधकाम कामगार अजूनही किडामुंगीसारखे मरत आहेत. त्यासाठी तुमच्या सरकारने काय केले?
2) पिक विम्यामध्ये झालेल्या गैरव्यवहारासंदर्भात मी पुराव्यासह मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. मात्र, भ्रष्ट अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली? विमा कंपनी अंबानी यांच्या मालकीची असल्याने कोणावरच कारवाई होत नाही. कंपन्यांनी मात्र, मोठ्या प्रमाणात नफा कमावला, यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावे?
3) पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखालील कृषिमूल्य आयोगाने उसाचा उत्पादन खर्च 32 हजाराने कमी असल्याचा अहवाल दिला आहे. त्याचबरोबर मंत्री सुभाष देशमुख, तानाजी सावंत, पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील, नितीन गडकरी यांनी ऊस उत्पादकांचे पैसे थकवले यावर काय उत्तर देणार?
4) एसटीबीटी बियाण्यांचा वापर केल्यास ते पुरवणाऱ्या कंपन्यांवर कारवाई न करता शेतकऱ्यांना तुरुंगात टाकले जाईल, असा दम कापूस उत्पादकांना देणार आहात का?
5) तूर, मूग, हरभरा, कांद्याचे आणि ठिबकचे अनुदान मिळाले नाही. आता झिरो बजेट शेतीचा पुरस्कार करत असल्याने कोणी तक्रार करू नये असे सांगणार का?
6) सिंचन घोटाळा आणि साखर कारखान्यातील घोटाळावर कारवाई करून तुरुंगात टाकणार असल्याचे म्हटले होते. मात्र, अनेकांना भाजपात प्रवेश दिला तर काहींना इन्कम टॅक्स आणि भीती दाखवून दाखवत आहात. हे प्रगतीच्या दृष्टीने आवश्यक आहे, हे जनतेला सांगणार का?
7) धनगर समाजाला आपण पहिल्याच कॅबिनेटमध्ये आरक्षण देणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, आता आचारसंहिता एक महिन्यावर आल्यावर धनगरांना एसटीचे सर्व लाभ आणि तरतुद केलेले निधी सर्व खर्च करून दाखवू, हे पटवून देणार का?
8) लिंगायत धर्मातील बहुसंख्य जातींना ओबीसीचा लाभ मिळत असताना पाटील देशमुख सारख्या वतनदार लिंगायत धर्मातील लोकांना ओबीसीचे आरक्षण देणे शक्य नाही. हे माहित असताना लिंगायत समाजाला ओबीसींच्या सवलती व खोटे आश्वासन दिले. मात्र, त्यांच्या स्वतंत्र धर्माच्या मागणीस पाठिंबा देणार नाही, असे सांगणार का?
9) 35 लाख पदांची मेगा भरती करून रोजगाराचा प्रश्न मिटणार असल्याचे जाहीर केले होते. पण अर्जच न केल्यामुळे मेघाभरती करता आली नाही, हे सांगणार का?
10) सरकारने आऊटसोर्सिंगद्वारे रोजंदारी पद्धतीने नोकऱ्या दिल्या आहेत. मात्र, त्यांच्या पदरात पडणारी रक्कम कमी आहे.
11) गेल्या चार वर्षात कृषी वीज पंपांना जोडण्या दिल्या नाहीत. अडीच रुपये पैसे जास्त दराने वीज बिलांची आकारणी करून शेतकऱ्यांना लुबाडण्याचे धोरण योग्य असल्याचे सांगणार का? असे अकरा सवाल शेट्टींनी केले आहेत.