पुणे - पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालय ( Rajiv Gandhi Zoo Pune open ) काल सुरू झाले. कोरोनामुळे दोन वर्षे प्राणी संग्रहालय बंद होते. आता जवळपास दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्राण्यांना पाहण्याची संधी पुणेकरांसह पर्यटकांना मिळत आहे. यावेळी आशियाई सिंहासह, शेकरू, वाघाटी मांजर हे नवे प्राणी बघायला मिळणार आहेत.
हेही वाचा - Shivaji Maharaj Jayanti 2022 : शिवजयंती निमित्त पुण्यातील जनता वसाहतीत फडकले हजारो भगवे झेंडे
काल, 20 मार्च रोजी पहिल्याच दिवशी पुणेकर पर्यटकांनी संग्रहालयात मोठी गर्दी केली. येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. शिवाय कोरोनाच्या नियमांचे पालन करून प्रवेश दिला जात आहे. मागील अनेक महिन्यांपासून कोरोनामुळे नागरिकांना बंधने होती. त्यात कात्रजच्या या बागेचाही समावेश होता. आता मात्र कोरोनाची स्थिती नियंत्रणात असल्याने ही बागही सर्वांसाठी खुली करण्यात आली आहे.
सकाळी 9 वाजून 10 मिनिटांनी प्राणी संग्रहालय पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी 8 वाजल्यापासूनच पर्यटकांनी तिकीटीसाठी रांगा लावल्या होत्या.
दोन वर्षांनंतर कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालय पर्यटकांसाठी खुले झाले आहे. पर्यटकांना याचा मोठा आनंद झाल्याचे पाहायला मिळाले. प्राणी संग्रहालय प्रशासनाच्यावतीने पर्यटकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. प्राणी संग्रहालयाच्या अधिकारी वर्गासह कर्मचाऱ्यांनीदेखील पर्यटकांचे स्वागत केले.
नव्या प्राण्यांसाठी खंदक तयार
वाघ, सिंह, बिबट्या, हरीण, गवा, लांडगा, कोल्हा, अस्वल, हत्ती, चौशिंगा, तरस आदी विविध प्राणी पर्यटकांना पाहता येणार आहेत. आगामी काळात झेब्रा आणि इतर काही प्राणी आणण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. त्यासाठी निविदा काढली जाणार आहे. प्राणी संग्रहालय बंद होते त्या कालावधीत नव्या प्राण्यांसाठी खंदक तयार करण्यात आले. विविध विकासकामेही झाली आहेत. जी काही बाकी आहेत तीही केली जाणार आहेत.