पुणे - ऑलिम्पिक हा मानसिकतेचा खेळ आहे, हे लंडन ऑलिम्पिकने मला शिकवले. ऑलिम्पिकचे प्रेशर हँडल करणे हेच महत्त्वाचे आहे. 2020 मध्ये होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकची तयारी जोमात सुरू आहे. 25 मीटर स्पोर्ट प्रकारात मी सहभागी झाले आहे, असे नेमबाज राही सरनोबत हिने सांगितले. ती पुण्यात पत्रकारांशी बोलत होती.
ऑलिम्पिक तयारी संदर्भात पुणे पत्रकार संघाच्या वतीने तिच्याशी वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. राही म्हणाली, 2012 च्या लंडन ऑलिम्पिकला मी 21 वर्षांची होते त्यावेळी तिथे पोहोचणे हेच माझ्यासाठी खूप मोठे होते. या स्पर्धेत पदक मिळवता आले नाही. मात्र सामना संपल्यानंतर स्कोर पाहिल्यावर जाणवलं, की हे आपण करू शकतो.
राही सध्या परदेशी प्रशिक्षकाकडून प्रशिक्षण घेत आहे. भारतात सध्या 25 मीटर पिस्टल प्रकारातल्या नेमबाजीसाठी चांगले प्रशिक्षक डोळ्यासमोर येत नाहीत. कारण ऑलिम्पिकमध्ये असे काही इव्हेंट्स आहेज जे आम्ही पहिल्यांदाच खेळलो. आमची ही पहिली पिढी आहे. त्यामुळे परदेशी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन घ्यावे लागेल. तसेच रिटायर झाल्यानंतर आमच्या माध्यमातून भारतात चांगले प्रशिक्षक उपलब्ध होतील. नेमबाजी प्रकारात खेळाडूला 35 ते 36 वयापर्यंत खेळता येते त्यामुळे मला आणखीन पाच ते सहा ऑलिम्पिक खेळायचे आहेत. आता तर माझी सुरुवात आहे, असेही राही म्हणाली.
कॉमनवेल्थ गेममध्ये नेमबाजी प्रकाराला समाविष्ट न करण्याबाबत बोलताना राही म्हणाली, कुठल्या खेळायला समाविष्ट करायचे हा आयोजक देशाचा निर्णय असतो. त्यामुळे आपण त्याकडे त्या दृष्टीनेच पाहिले पाहिजे. टोकियो ऑलम्पिकची तयारी जोमात सुरू असून यावेळी मी निश्चितच पदक मिळवेल, असा विश्वास राहीने व्यक्त केला आहे.