पुणे - शहराच्या सुरक्षिततेची जबाबदारी असणाऱ्या पुणे पोलिसांवरच आता नजर ठेवली जात आहे. संवेदनशील परिसरात पोलीस पेट्रोलिंग करतात की नाही हे तपासण्यासाठी चक्क पोलीस प्रशासनाने क्यूआर पेट्रोलिंग अॅप तयार केले आहे. त्याद्वारे पोलिसांवरच आता तिसऱ्या डोळ्याची नजर राहणार आहे.
संवेदनशील स्पॉट असलेल्या ठिकाणी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी पेट्रोलिंग करत असतात. यापूर्वी पेट्रोलिंगसाठी गेलेले कर्मचारी रजिस्टरवर स्वाक्षरी करून उपस्थिती नोंदवत होते. मात्र, आता थर्ड आय कार्यप्रणालीच्या माध्यमातून पोलिस प्रशासनाने क्यूआर पेट्रोलिंग अॅप तयार केले आहे. त्यामुळे आता पेट्रोलिंग करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना क्यूआर कोड स्कॅन करून उपस्थिती लावावी लागत आहे आणि त्यात अधिक काटेकोरपणा येत आहे.
शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून गस्त घातली जाते. गस्त घातल्यानंतर अनुचित प्रकार घडला नसल्याची खात्री झाल्यानंतर हे क्यूआर कोड स्कॅन केले जात आहेत. हा कोड स्कॅन झाल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांची नोंद थर्ड आय प्रणालीमध्ये केली जात असल्याने यामुळे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मदत होईल हे मात्र नक्की.