पुणे - फुरसुंगी कचरा डेपो हटवण्यासाठी उरुळी कांचन गावातील ग्रामस्थ पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. त्यामुळे पुण्याच्या कचऱ्याचा प्रश्न पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कचरा डेपो हटाव कृती समितीने आज (शनिवार) स्वातंत्र्य दिनापासून बेमुदत आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
शनिवारी सकाळपासूनच कचरा डेपोबाहेर फुरसुंगी आणि उरुळी देवाची गावातील नागरिकांनी आंदोलन सुरु केले आहे. सुरुवातीला गांधीगिरी आंदोलनाच्या माध्यमातून कचरा घेऊन येणाऱ्या वाहनचालकांना गुलाबपुष्प दिले जात आहे. टप्प्याटप्प्याने आंदोलनाची तीव्रता वाढवली जाणार असल्याचे यावेळी ग्रामस्थांनी सांगितले.
हेही वाचा - 74वा स्वातंत्र्यदिन : पंढरीच्या विठुरायाला तिरंगी रंगाच्या फुलांची आरास
ग्रामस्थांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे पुण्यात पुन्हा एकदा कचऱ्याचे ढीग साठण्याची भीती निर्माण झाली आहे. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच अशा परिस्थितीत शहरात कचरा साठल्यानंतर नागरिकांचे आरोग्य पुन्हा धोक्यात येण्याची शक्यता आहे. ऐन गणेशोत्सवात पुणेकरांना कोरोना बरोबर कचऱ्याची समस्या भेडसावणार असल्याचे यातून दिसत आहे.