पुणे- राज्य सरकारची परवानगी नसतानाही परस्पर महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाच्या अंगलट आला आहे. हा निर्णय कोणत्या नियमांच्या आधारावर घेतला, याचा खुलासा करण्याचा आदेश उच्च शिक्षण विभागाने विद्यापीठाला दिला आहे.
विद्यापीठांतर्गत असणाऱ्या महाविद्यालयांत पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे वर्ग राज्य सरकारच्या परवानगीविना ११ जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्याचे धाडस सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतला. त्याबाबत उच्च शिक्षण विभागाने खुलासा करण्याचे आदेश काढले आहेत. या आदेशानंतर पुणे विद्यापीठाने महाविद्यालय सुरू करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे.
हेही वाचा-'जिहादी दहशतवाद' शब्दावरून पुणे विद्यापीठ गोत्यात...अखेर दिलगिरी
कोरोनाचा प्रादूर्भाव कमी होत असल्याने पदवी, पदव्युत्तर महाविद्यालयांत नियमित वर्ग सुरू करण्याबाबत आढावा घेण्यासाठी विद्यापीठाने प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली होती. या समितीने पुणे, नाशिक, नगर जिल्ह्यातील स्थितीचा आढावा घेतला. या समितीच्या अहवालाच्या आधारे विद्यापीठाने ११ जानेवारीपासून सर्व महाविद्यालयांत पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.
हेही वाचा-'या' तारखेला सुरू होणार पुण्यातील महाविद्यालये; विद्यापीठाचा महत्त्वाचा निर्णय
उच्च शिक्षण विभागाच्या नोटीसने विद्यापीठावर नामुष्की-
राज्य सरकारने कोणतेही आदेश दिले नसताना कोणत्या नियमाच्या आधारे हा निर्णय घेतला, याचा तात्काळ खुलासा उच्च शिक्षण विभागाने विद्यापीठाकडे मागितला आहे. यासंबंधीचे पत्र उच्च शिक्षण संचालनालयाने विद्यापीठाला पाठविले आहे. त्यानंतर विद्यापीठाने त्वरित महाविद्यालय सुरू करण्याच्या निर्णयास स्थिगिती दिली आहे. त्यामुळे 11 जानेवारीपासून महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय मागे घेण्याची नामुष्की विद्यापीठावर आली आहे.
महाविद्यालये सुरू करण्याची विद्यार्थ्यांची होती मागणी -
महाविद्यालयात अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने सुरू झाले आहेत. परंतु प्रॅक्टिकल होत नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना संकल्पना समजण्यास अडचण निर्माण होत होती. त्यामुळे लवकरात लवकर महाविद्यालये सुरू करण्यात यावे, अशी मागणी होत होती.
दरम्यान, कोरोना महामारीमुळे राज्यातील सर्व महाविद्यालये बंद आहेत.