पुणे - दौंड तालुक्यातील कानगाव येथे भीमा नदीच्या पात्रातुन बेकायदेशीरपणे वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर पोलिसांनी कारवाई केली. फायबर बोटींच्या साह्याने उपसा करत जेसीबीच्या साह्याने वाळू ट्रॅक्टर आणि ट्रकमध्ये भरत असताना पोलिसांना आढळून आले. या अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच वाळू उपसा आणि वाहतुकीसाठी वापरली जाणारी वाहने जप्त करण्यात आली आहे.
हेही वाचा... शेतकऱ्यांच्या हातावर तुरी.. हमीभावापेक्षा कमी दराने तुरीची खरेदी
कानगाव येथे भीमा नदीच्या पात्रात अवैधरित्या वाळू उपसा होत असल्याबाबत माहिती बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी बारामती क्राईम ब्रँचचे प्रमुख पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना याबाबत माहिती दिली. त्यांनी त्या अनुशंगाने यवत पोलीस स्टेशन हद्दीत कानगाव येथे जात माहिती घेतली. त्यानंतर बारामती क्राइम ब्रांच पोलीस व यवत पोलीस स्टेशनचे अधिकारी तसेच महसूलचे अधिकारी यांनी या ठिकाणी अचानक छापा टाकला. त्या ठिकाणी भीमा नदी पात्रात आरोपी वाळू उत्खनन करण्याबाबत कोणताही लिलाव करण्यात आला नसतानाही, बेकायदेशीरपणे यांत्रिक बोटीने वाळू उपसा करत असताना आढळून आले.
हेही वाचा... "सारथी संस्थेत भ्रष्टाचार झाल्याचे आरोप खोटे, कुठल्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार"
या ठिकाणी पोलिसांनी खलीलप्रमाणे मुद्देमाल जप्त केला आहे ;
- 24 लाख रुपये किंमतीच्या चार फायबर लोखंडी बोटी
- 8 लाख रुपये किंमतीच्या चार लहान बोटी
- 16 लाख रुपये किमतीचे दोन वाळू वाहतूक करणारे ट्रक
- 30 लाख रुपये किमतीचे दोन जेसीबी
- 15 लाख रुपये किमतीचे 3 ट्रॅक्टर (ट्रॉलीसह)
- 30 हजार रुपये किंमतीची 10 ब्रास वाळू
असा एकूण 93 लाख 30 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलीस आणि महसूल पथकातील कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतला आहे. याबाबत एकूण 12 आरोपींच्या विरोधात यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना, यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती क्राईम ब्रँच, यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, पाटस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक सचिन घाडगे यांनी केली. तसेच यावेळी महसूल पथकाचे मंडल अधिकारी संदीप जाधव, तलाठी बालाजी जाधव आदी उपस्थीत होते.
हेही वाचा... जामिया हिंसा : गोळीबार करणाऱ्या 'त्या' तरुणाला पैसे कोणी पुरवले?