पुणे - कोरोना महामारीतही रुग्णांची आर्थिक लूट होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. कोरोना बाधित रुग्णाला एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात रुग्णवाहिकेने नेण्यासाठी तब्बल आठ हजार रुपये उकळण्यात आले आहेत. हा प्रकार उघडकीस झाल्यानंतर संबंधित रुग्णवाहिकेच्या कंपनीवर बिबेवाडी पोलीस स्टेशनमध्ये फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोटार वाहन निरीक्षक धनंजय गोसावी (वय 41) यांनी रुग्णवाहिका कंपनीच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली होती. पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णाला एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात येणार होते. त्याकरिता नातेवाईकांनी संजीवनी सर्विसेस या कंपनीची रुग्णवाहिका मागविली होती. या रुग्णवाहिकेने सात किलोमीटर अंतरासाठी 900 रुपये घेणे अपेक्षित होते. परंतु कंपनीने संबंधित व्यक्तीकडून तब्बल आठ हजार रुपये उकळले. याबाबत रुग्णाच्या नातेवाईकांनी जिल्हा प्रशासनाकडे तक्रार केली होती.
या रुग्णवाहिकेबाबत चौकशी केली असताना आरटीओकडे या वाहनाची मोबाईल क्लिनिक व्हॅन अशी नोंदणी होती. परंतु, नियमांचे उल्लंघन करत कंपनीने वाहनाचा रुग्णवाहिका म्हणून वापर केला होता. हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर आरटीओने संजीवनी ॲम्बुलन्स सर्व्हिसेस या कंपनी विरोधात तक्रार दिली. त्यानुसार बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक लिट्टे करीत आहेत.