पुणे - कुख्यात गुंड गजानन मारणेच्या तळोजा कारागृह ते पुणे या रॅलीचा मास्टर माईंड व अट्टल गुन्हेगार रुपेश मारणे यावर पुणे शहर पोलीस आयुक्तांनी एम.पी.डी.ए. कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. गेल्या 1 वर्षामध्ये पुणे पोलिसांची ही 50 वी स्थानबद्धतेची कारवाई आहे. एमपीडीए कायद्यान्वये औरंगाबाद मध्यवर्ती कारागृह येथे एक वर्षासाठी स्थानबद्धतेचे आदेश पारित करण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.
हेही वाचा - Pune Blood Donation Camp : मांसाहारी रक्तदात्याला 2 किलो चिकन आणि शाकाहारीला अर्धा किलो पनीर
औरंगाबाद येथे १ वर्षाकरीता स्थानबद्धतेचे आदेश
कोथरूड पोलीस ठाणे हद्दीमध्ये राहणारा गुन्हेगार रुपेश कृष्णराव मारणे (वय ३८ वर्षे रा. नवएकता कॉलनी, शास्त्रीनगर, कोथरूड, पुणे) हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने त्याच्या साथिदारांसह कोथरूड, वारजे माळवाडी, स्वारगेट, येरवडा, पौड, तळेगाव दाभाडे, समर्थ पोलीस ठाणे, पुणे हद्दीमध्ये तलवार, लोखंडी रॉड, लोखंडी कोयता, लाकडी बांबू या सारख्या जीवघेण्या हत्यारांसह फिरून खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, दुखापत, दंगा, सरकारी कामात अडथळा, साथीचा रोग प्रतिबंधक उपाय योजनेचे उल्लंघन, बेकायदा हत्यार बाळगणे यांसारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत.
मागील १८ वर्षांमध्ये त्याच्याविरुद्ध ९ गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे या परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. तसेच, त्याच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल, या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करण्यासाठी धजावत नव्हते. प्राप्त प्रस्तावांसह कागदपत्रांची पडताळणी करून अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी रुपेश मारणे विरुद्ध एमपीडीए कायद्यान्वये औरंगाबाद मध्यवर्ती कारागृह, औरंगाबाद येथे १ वर्षाकरीता स्थानबद्धतेचे आदेश पारीत केले आहेत.
मागील १ वर्षामध्ये ५० गुन्हेगार एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध
पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी दहशत निर्माण करणाऱ्या व सक्रिय अट्टल गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण अवलंबले आहे. त्यानुसार मागील १ वर्षामध्ये ५० गुन्हेगारांना एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध करण्यात आले आहे. यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांच्या कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे, असे पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता म्हणाले.