पुणे - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आमदार नितेश राणे आणि नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे यांच्या विरोधात पुणे पोलिसांनी लूकआउट सर्क्युलर जारी केले आहे. एका खासगी संस्थेकडून घेतलेल्या कर्जासंबंधात हे सर्क्युलर जारी करण्यात आले आहे. कर्जाची रक्कम थकीत असल्यामुळे ही सर्क्युलर बजावण्यात आले आहे.
याविषयी अधिक माहिती देताना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले, नितेश राणे आणि नीलम राणे यांच्याविरोधात एका संस्थेने आर्थिक प्रकरणी तक्रार केली होती. यासंबंधी केंद्र सरकारकडून, केंद्रीय गृह मंत्रालयाकडून महाराष्ट्र सरकारला एक तक्रार प्राप्त झाली होती. त्यांनी पुणे पोलीसांना याबाबत लुकआऊट सर्क्युलर काढण्यास सांगितले. त्यानुसार पुणे पोलिसांनी हे सर्क्युलर काढले आहे.
दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेड या कंपनीने ही तक्रार केली आहे. राणे यांच्या पार्कलाइन प्रॉपर्टीज लिमिटेड या कंपनीने 25 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. तर नीलम राणे या कंपनीच्या सहअर्जदार होत्या. या कर्जाची परतफेड न केल्याने दोघांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. या शिवाय राणे यांच्या आणखी एका कंपनीने कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जाची परतफेड न झाल्याने तक्रार दाखल करण्यात आली होती. केंद्र सरकारकडून आदेश आल्यानंतर गृह मंत्रालयाच्या आदेशाने पुणे पोलिसांनी ही लूकआउट नोटीस जारी केली आहे.
हे ही वाचा - गणेशोत्सव 2021: दगडूशेठ हलवाई गणपतीची प्रतिष्ठापणा कधी? वाचा सविस्तर...