पुणे - शहरातील मार्केट यार्ड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सॅलिस्बरी पार्क परिसरात असणाऱ्या एका बंगल्यावर पुणे पोलिसांनी छापा टाकला. यावेळी आतमध्ये जुगार खेळणाऱ्या 19 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्यांमध्ये काही राजकीय पदाधिकारी आणि ठेकेदार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी 1 लाख 53 हजार 900 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
हेही वाचा - जुगार खेळणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई, 7 जणांवर गुन्हा
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, सॅलिसबरी पार्क परिसरातील एका बंगल्यामध्ये जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच मार्केटयार्ड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान पोलीस आल्याची माहिती मिळाल्यानंतर जुगार क्लब चालवणारा हर्षल पारख याने बंगल्याला बाहेरून कुलूप लावले व पळ काढला. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांना बंगल्याला बाहेरून कुलूप असल्यामुळे कारवाई करता येत नव्हते, त्यामुळे सकाळी 10.45 वाजेपर्यंत पोलीस बंगल्याबाहेर थांबून होते. त्यानंतर वरिष्ठ अधिकारी आणि पंच घटनास्थळी हजर झाल्यानंतर पोलिसांनी या बंगल्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि आतमध्ये जुगार खेळणाऱ्या 19 जणांना ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्यांमध्ये काही राजकीय पदाधिकारी आणि ठेकेदारांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी या ठिकाणाहून रोख 53 हजार 900 रुपये आणि चार दुचाकी आणि जुगार खेळण्याचे साहित्य, असा 1 लाख 53 हजार 900 रुपये किमतीचे साहित्य जप्त केले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींवर भा.द.वीच्या कलम 342, 188, 269 राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा, कलम 51 ब व महाराष्ट्र कोविड 19 उपाययोजना 2020 चे कलम 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनघा देशपांडे, पोलीस उपनिरीक्षक संतोष शिंदे, अमोल कदम, चेतन भोसले, पोलीस कर्मचारी गोविंद गोरडे, निषाद कोंडे, प्रशांत धोत्रे, स्वप्नील कदम, पांडुरंग भिलारे, राहुल दौंडकर वैभव बधे, मकसूद तांबोळी, रोहित कणसे यांच्या पथकाने केली.
हेही वाचा - लहान मुलांसाठी स्वतंत्र कोविड वार्ड सुरू करावे - उपमुख्यमंत्री अजित पवार