पुणे - पिंपरी-चिंचवड शहरात एका वैद्यकीय महाविद्यालयात MBBS ला प्रवेश मिळवून देतो, असे सांगत आर्थिक फसवणूकीचा प्रयत्न झाला आहे. पालकांकडे १५ लाख रुपयांची मागणी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची महाविद्यालयाच्या उपप्राचार्यांनीच झाडाझडती घेतल्याने या प्रकरणाचे बिंग फुटले आहे.
वैद्यकीय महाविद्यालयातील उपप्राचार्य यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर याप्रकरणी दोन आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर त्यांना तळेगाव पोलिसांनी अटक केली आहे. रिजवान अब्दुलरहेमान मोहम्मद (३२ रा. नागपूर) सुशांत उपेंद्रसिंग परमार (३४ रा. पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
काय आहे प्रकरण...
लक्ष्मीकांत रंगनाथ स्वामी (रा. वसमत) यांच्या मुलीला वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा होता. तेव्हा या दोन्ही आरोपींनी प्रवेशासाठी १५ लाख रुपये लागतील, आम्ही तुम्हाला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देतो असे सांगितले. मात्र ही बाब महाविद्यालयाच्या प्रशासनाच्या वेळीच लक्षात आली आणि दोन्ही आरोपींचे बिंग फुटले. या दोन्ही आरोपींना उपप्राचार्यांनी महाविद्यालयाच्या कार्यालयात बोलवून किती पैसे लागतात असे विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यानंतर हे दोघेही गोंधळून गेले होते. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे संबंधित वैद्यकीय महाविद्यालयाचा कोरा प्रवेश अर्ज आणि काही शैक्षणिक प्रमाणपत्रे आढळून आली. यानंतर उपप्राचार्यांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर दोन्ही आरोपींना तळेगाव पोलिसांनी अटक केली आहे.
हेही वाचा... वर्ध्यात वैद्यकीय प्रवेशाच्या नावावर पालकांना २८ लाखांना गंडा; हाय प्रोफाइल दलालांची टोळी सक्रिय
वर्ध्यातील प्रकरणाची पूनरावृत्ती टळली...
काही दिवसांपूर्वी वर्ध्यातील सेवाग्रामचे कस्तुरबा हेल्थ सोसायटी अंतर्गत महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स येथेही पालकांना वैद्यकीय प्रवेशाच्या नावाखाली 28 लाखांचा गंडा घालण्यात आला होता. पिंपरी चिंचवड येथे वर्धा प्रमाणे फसवणूक झाली नसली तरिही वारंवार होणाऱ्या अशा घटना पाहता महाविद्यालय प्रशासन आणि पालक यांनीही जागरूक राहणे आवश्यक असल्याचे दिसून येते