पुणे - कर्नाटकमध्ये पाऊस सुरू असल्यामुळे अलमट्टी धारणातून पाण्याचा विसर्ग होण्यासाठी वेळ लागत आहे. मात्र, रविवारपर्यंत कोल्हापूर आणि सांगलीमधील पाणी ओसरण्याची शक्यता आहे. अशी माहिती विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यावेळी दीपक म्हैसेकर म्हणाले की, पावसामुळे आत्तापर्यंत पुणे विभागामधील 27 तालुक्यांमधील 585 गावांना पुराचा फटका बसला आहे. त्यामुळे, 85,119 कुटुंबांमधील 4 लाख 13 हजार नागरिकांचे 535 निवारा केंद्रामध्ये स्थलांतर करण्यात आले आहे. तसेच, पावसामुळे आत्तापर्यंत 30 जणांचा मृत्यू झाला असून, 10 नागरिक बेपत्ता आहेत. यामध्ये ब्रह्मनाळ दुर्घटनेतील 12 जणांचा समावेश आहे.
वाहतुकीच्या परिस्थिती बद्दल म्हैसेकर म्हणाले की, पुणे विभागामधील एकूण 203 रस्ते आणि 94 पूल बंद आहेत. पूरग्रस्त भागामध्ये मदत पाठवण्यासाठी ग्रीन कॉरिडोअर निर्माण करण्यात आला आहे. त्यामुळे पुण्यातून सध्या सांगलीला मदत पाठवण्यात येत आहे. कोल्हापूर पर्यंत महामार्ग सुरू झाल्यानंतर तेथेही मदत पोहचवण्यात येणार आहे. कर्नाटकमध्ये देखील पावसामुळे महामार्ग बंद आहे. त्यामुळे वाहतूक सोलापूरमार्गे वळवण्यात आली आहे. मात्र, राष्ट्रीय महामार्ग रविवारी सुरू होण्याची शक्यता आहे. त्यानंतर केवळ मदत पोहचवण्यासाठी वाहतूक सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा पूर्ववत करण्यासाठी सरकारकडून विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. महावितरण विभागाकडून देखील नादुरुस्त झालेले ट्रान्सफॉर्मर्स बदलण्यासाठी नवीन ट्रान्सफॉर्मर्स नेण्यात येत आहेत.
त्याप्रमाणेच, ग्रामीण भागामध्ये स्वच्छतेसाठी स्वयंसेवी संस्थांची मदत लागणार आहे. यासाठी पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि कोकण विभागीय आयुक्त कार्यालायमधील मनुष्यबळ पाठवण्यात येणार आहे.