पुणे - विमानतळावरील धावपट्टीच्या कामासाठी पुणे येथील लोहगाव विमानतळावरील प्रवासी उड्डाणे १६ ऑक्टोबरपासून तब्बल १५ दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे पुण्यातील प्रवाशांना हवाई प्रवासासाठी पूर्णपणे मुंबई येथील विमानतळावर अवलंबून रहावे लागणार आहे. याचा आधीपासून बुकिंग असलेल्या प्रवाशांना मोठा मनस्ताप होणार आहे.
हवाई दलाकडून सप्टेंबर २०२० मध्ये लोहगाव विमानतळाच्या धावपट्टीच्या देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. या कामाचा महत्त्वाचा टप्पा २६ ऑक्टोबरपासून सुरू झाला. तेव्हापासूनच लोहगाववरून रात्री आठ ते सकाळी आठ या वेळेत होणारी प्रवासी उड्डाणे बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे जवळपास वर्षभर लोहगाववरून केवळ दिवसाच उड्डाणे होत आहेत. ही उड्डाणेदेखील बंद होणार आहेत.
तिकीट रकमेचा परतावा मिळविताना प्रवाशांची होणार दमछाक!
हवाई दलाच्या निर्णयानुसार १६ ऑक्टोबरला सकाळपासून ३० ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत ही सेवा बंद राहणार असल्याचे विमानतळ प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आतापर्यंत १६ ते ३० ऑक्टोबर कालावधीत तिकीट आरक्षित केलेल्या प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे. लॉकडाऊन काळात तसेच रात्रीची उड्डाणे बंद केली, तेव्हा हजारो प्रवाशांना तिकीट रद्द करावे लागले होते. त्यावेळी तिकीट रकमेचा परतावा मिळविताना दमछाक झाली होती. तोच अनुभव प्रवाशांना येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गतवर्षीच विमानतळाच्या धावपट्टीच्या कामाबाबत घेण्यात आला निर्णय
पुणे विमानतळावर धावपट्टीचे काम २६ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आले आहे. हे काम सुमारे वर्षभर चालेल, असे पुणे विमानतळाचे संचालक कुलदीप सिंह यांनी गतवर्षी सांगितले होते. ते म्हणाले होते, की धावपट्टीचे काम रात्री होणार आहे. त्यामुळे विमानतळावरील उड्डाणे आणि विमान उतरण्याचे कामकाज रात्री ८ ते सकाळी ८ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. केवळ दिवसा विमान उड्डाणे आणि विमान धावपट्टीवर होण्याचे काम सुरू राहणार असल्याचेही कुलदीप सिंह यांनी सांगितले होते. या निर्णयामुळे १० टक्के विमान उड्डाणाच्या वेळेत बदल करण्यात आला होता. त्यावेळी पुण्याचे आमदार गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली विमानतळाच्या सल्लागार समितीची मंगळवारी बैठक झाली. यामध्ये प्रवाशांना सुविधा देणे, विमानतळाच्या पायभूत सुविधा व रस्त्यांचे रुंदीकरण आदी विषयांवर चर्चा करण्यात आली होती.
हेही वाचा-ऑनलाइन बुकिंग करून येणाऱ्या भाविकांनाच मिळणार साईदर्शन, शनिदर्शनासाठी ऑफलाइन पद्धत; वाचा नियमावली