पुणे - गेल्या 13 दिवसांपासून ठप्प असलेली पुणे विमानतळारील हवाई वाहतूक आजपासून पुन्हा सुरु होईल. याठिकाणी तिकीट बुकिंग सेवा पूर्ववत झाली आहे. सकाळी 8 वाजता प्रवासी वाहतूक पुन्हा सुरु होईल. मात्र, रात्री आठ ते सकाळी आठ दरम्यान वाहतूक बंदच राहील. रात्रीची विमान वाहतूक सुरू होण्यासाठी आणखी दोन महिने वाट पहावी लागेल. धावपट्टीच्या दुरुस्तीचे कामासाठी विमानतळावरून वाहतूक 16 ते 29 ऑक्टोबर दरम्यान बंद ठेवण्यात आली होती. यापूर्वी दसऱ्याच्या दिवशी पुणे विमानतळावरुन तब्बल 63 विमानांनी उड्डाण केले होते. या काळात 18 हजार प्रवाशांची ये-जा झाली होती.
पुण्यात विमान प्रवासी वाहतुकीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सध्या असलेल्या इमारतीत प्रवाशांची मोठी गर्दी होते. या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी पुणे विमानतळ प्राधिकरणाने 5 लाख चौरस फुटापेक्षा जास्त क्षेत्रफळ आणि अत्याधुनिक सोयीसुविधा असलेलं इंटिग्रेटेड टर्मिनल बांधण्यात येत आहे. या टर्मिनलमध्ये दरवर्षी 1 कोटी 90 लाख प्रवाशांना सामावून घेण्याची क्षमता असणार आहे. नव्या टर्मिनलचं 61 टक्के काम पूर्ण झालं असून 2022 पर्यंत ते वापरासाठी खुलं होईल, अशी माहिती दिली आहे. पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट यांच्या उपस्थितीत 30 ऑगस्ट रोजी विमानतळ प्राधिकरणाची बैठक पार पडली होती. त्यावेळी त्यांनी विमानतळ विस्तारीकरणाबाबत आढावा घेण्यात आला होता.
हेही वाचा - पुणे तिथे विमानतळ 15 दिवस राहणार उणे! नागरिकांची सणासुदीला गैरसोय