पुणे : पुण्यात मागील काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांचा मुद्दा गाजत आहेत. आता जणू त्यावरूनच राजकारण तापलेल पाहायला मिळत आहे. मात्र पुण्यात भटकी कुत्री किती आहेत हे आजवर कुणालाच कळलं नाही. परंतु या कुत्र्यांचा त्रास आणि त्यांनी मांडलेला उच्छाद पुणेकरांना नेहमीच सहन करावा लागत आहे हे ही तितकंच खरं. आता महापालिकेनं यावर उपाय काढत या भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांची नसबंदी ( Sterilization Of Stray Dogs In Pune ) करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ३.५ कोटींची तरतूद ( Provisions In PMC Budget ) करण्यात आली आहे.
महापालिकेचा उपाय
शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जी अंदाजे आकडेवारीसमोर आली आहे त्यानुसार तब्बल चार लाख भटकी कुत्री सध्या पुणे शहरात असल्याचं समोर आलं आहे. आता यांचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिकेकडून उशिरा का होईना पाच कंपन्यांची नेमणूक करण्यात आली असून, एका कुत्र्याच्या नसबंदीसाठी या कंपनीला सोळाशे रुपये दिले जाणार आहेत असं महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आल आहे. पण यात खरी गंमत म्हणजे हे भटके कुत्रे पकडून त्याची नसबंदी केल्यानंतर त्याला पुन्हा त्याच्या मूळ जागी सोडण्यासाठी कंपनीला दोनशे रुपये दिले जाणार आहे. अशाप्रकारे एका कुत्र्याच्या पाठीमागे या कंपनीला सोळाशे रुपये दिले जाणार आहे. तर दुसरीकडे पुण्यात भटक्या कुत्र्यांची अधिकृत आकडेवारीच नसल्यामुळे पुणेकरांच्या पैशाची अशाप्रकारे उधळपट्टी होत असल्याचा आरोप सामाजिक संघटनांनी केला आहे.
पुणे महापालिकेची साडेतीन कोटींची तरतूद
पुणे महापालिकेनं भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी या वर्षीच्या अंदाजपत्रकात तीन कोटी 60 लाख रुपयांची तरतूद केली आहे. पुणेकरांना मात्र त्या भटक्या कुत्र्यांच्या त्रासापासून अजूनही मुक्तता मिळाली नाही हे देखील तितकंच खरं आहे.