पुणे - नवाब मलिक ( Nawab Malik ) यांच्या मंत्रिपद वाचविण्यासाठी खुद्द शरद पवारच ( Sharad Pawar ) ठाकरे सरकारवर दबाव आणत आहेत, असा आरोपी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर ( Pravin Darekar ) यांनी केला आहे. पुण्याच्या दौऱ्यावर असताना माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना दरेकर बोलत होते. ते म्हणाले, देशद्रोही दाऊदच्या हस्तकाची पाठराखण करणारे ठाकरे सरकार महाराष्ट्राच्या जनतेच्या जिवाशी खेळत असून दाऊदच्या हातचे बाहुले झाले आहे. सत्तेच्या सुरक्षेसाठी जनतेच्या सुरक्षेला मूठमाती देण्याचा खेळ ठाकरे सरकारने ताबडतोब थांबवावा आणि नवाब मलिकची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून महाराष्ट्र वाचवावा, अशी मागणीही यावेळी प्रवीण दरेकर यांनी केली.
मुख्यमंत्रीपद वाचविण्यासाठी उद्धव ठाकरे दाऊद्या हस्तकास संरक्षण देत आहेत - शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता म्हणून मिरविणाऱ्या नवाब मलिक यांचा खरा चेहरा आता ईडीच्या कारवाईनंतर समोर येत आहे. तपासानंतर आणखीही अनेक कारवाया उजेडात येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देश अस्थिर करण्यासाठीच दाऊद इब्राहीमने बॉम्बस्फोट घडविले होते. या कटाच्या अंमलबजावणीसाठी स्थानिक पातळीवर पैसे उभारण्याच्या योजनेचाच एक भाग म्हणून बेनामी मालमत्ता मातीमोल भावाने विकत घोऊन मोठ्या प्रमाणावर काळा पैसा गोळा करण्याचे षडयंत्र आता उघडकीस येऊ लागले आहे. पुढील तपासात आणखीही काही बाबी स्पष्ट होण्याची शक्यता आहे. असे असतानाही, नवाब मलिक यांचे मंत्रिपद वाचविण्यासाठी खुद्द शरद पवारच ठाकरे सरकारवर दबाव आणत असून मुख्यमंत्रीपद वाचविण्यासाठी उद्धव ठाकरे या दबावापुढे झुकून दाऊदच्या हस्तकास संरक्षण देत आहेत, असा आरोप दरेकर यांनी यावेळी केला.
हेही वाचा - Cheating in Pune : अजित पवारांच्या पीएसोबत ओळख असल्याचे सांगत 10 लाख रुपयांची फसवणूक; पुण्यात आरोपीला अटक