पुणे - विमानतळ परिसरात पुणे पोलीस आणि सैन्य दलाच्या गुप्तचर पथकाने केलेल्या संयुक्त कारवाईत कोट्यवधी रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. याप्रकरणी सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून यात सैन्य दलातील एका व्यक्तीचा समावेश आहे. विमानतळ पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळ परिसरात बनावट नोटांचे मोठे रॅकेट असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पुणे पोलिसांची क्राईम ब्रँच आणि गुप्तचर विभागाने सापळा रचला. एका पोलीस कर्मचाऱ्याला भारतीय चलनाच्या बदल्यात विदेशी चलन घेण्यासाठी पाठवले. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. विमानतळ परिसरातील एका बंगल्यात हे रॅकेट सुरू होते. याच ठिकाणी ते बनावट नोटा छापत होते. पोलिसांनी या बंगल्यातून छुपे कॅमेरे, दोन बंदूक, कम्प्युटर, लॅपटॉप, प्रिंटिंग मशीन आणि इतर साहित्य जप्त केले. या बंगल्यातल्या एका खोलीत या सर्व नोटांची थप्पी लावून ठेवली होती. याशिवाय तीन मोठमोठ्या ट्रंकमध्येही या नोटा ठेवण्यात आल्या होत्या. यामध्ये दोन हजार, पाचशे, हजार रुपयांच्या जुन्या नोटा, विदेशी चलन होते. मोठ्या प्रमाणात असलेल्या या नोटा मोजण्याचे काम अजूनही सुरू आहे. ही रक्कम 10 कोटीहून अधिक असण्याची शक्यता आहे.
बंगल्यात कोणी प्रवेश करुन नये म्हणून होते 'विदेशी श्वान'
या बंगल्यात इतर कोणी प्रवेश करू नये, यासाठी विदेशी जातीची चार कुत्री बांधून ठेवण्यात आली होती. गुप्तचर विभागाकडून माहिती मिळाल्यानंतर सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिसवे आणि उपायुक्त बच्चन सिंग यांनी कारवाई करण्याचा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शाखेचे कर्मचारी आणि सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली.