पुणे - पुणे महानगरपालिकेतर्फे PMPML च्या बसने पुणे शहरात सर्वसामान्य नागरिकांना कमी दरामध्ये जास्त प्रवास करता यावा या दृष्टीकोनातून शहराच्या मध्यवर्ती भागात कोठेही 10 रुपयात प्रवास अशी योजना सुरू करण्यात आली आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी ही माहिती दिली.
'लॉकडाऊननंतर योजनेचा लोकार्पण सोहळा'
स्थायी समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर हेमंत रासने यांनी 10 रुपयांमध्ये पुणे शहरात मध्यवर्ती भागात कोठेही प्रवास करा ही अभिनव योजना महापालिकेच्या अर्थसंकल्पात मांडली होती. ही योजना आता लवकरच पूर्णत्वास येण्याच्या मार्गावर आहे. यासाठी लागणाऱ्या 50 बसची खरेदी केली असून त्या चाकण येथील वर्कशॉपमध्ये दाखल झाल्या आहेत. हेमंत रासने यांनी या बसेसची पाहणी केली. लॉकडाऊन उठल्यानंतर या योजनेचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
10 रुपयात दिवसभर प्रवास!
याविषयी अधिक माहिती देताना हेमंत रासने म्हणाले, या योजनेसाठी शहरामध्ये सहा झोन करण्यात येणार आहेत. प्रत्येक झोनमध्ये 50 बसेस असतील. एकदा तिकीट काढल्यानंतर दिवसभरात या झोनमध्ये प्रवाशाला कितीही वेळेस प्रवास करता येईल. प्रायोगिक तत्त्वावर सुरुवातीला पुण्याच्या पेठ परिसरात ही योजना राबवली जाणार आहे. ही योजना सर्वसामान्य नागरिकांच्या फायद्याची असून याद्वारे नागरिकांच्या वेळेत आणि पैशातही बचत होण्यास मदत होणार आहे.
हेही वाचा - भूमिका मांडणार; २७ मे पर्यंत मराठा समाजाने शांत राहावे - संभाजीराजे छत्रपती
हेही वाचा - मोदी तर दिलदार नेते, महाराष्ट्रालाही १५०० कोटी रुपये देतील - संजय राऊत