पुणे - नो पार्किंगमध्ये उभी असणारी दुचाकी चालकासह उचलून वाहतूक पोलिसांनी टेम्पोत भरण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील नाना पेठ परिसरात गुरुवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. वाहतूक पोलिसांच्या या मनमानी कारभारामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.
मागील काही दिवसांपासून पुणे शहरातील चौकाचौकात वाहतूक पोलिसांनी दुचाकीस्वारांना अडवून, वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडून वसुली केली जात असल्याचे प्रकार जोरात सुरू आहे. शहरातल्या कोणत्याही चौकात पाहिले असता वाहतूक पोलिसांचा घोळक्यात येणाऱ्या-जाणाऱ्या दुचाकीस्वारांना अडवताना दिसतो. समर्थ वाहतूक विभागाच्या अंतर्गत असलेल्या नाना पेठेत तो पार्किंग मध्ये दुचाकी उभी असल्याचे कारण सांगत एका दुचाकीस्वाराला दुचाकीस उचलून वाहतूक पोलिसांनी आणि तेथील कर्मचाऱ्यांनी टेम्पो मध्ये भरले. त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या या तुघलकी कारभारामुळे नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. वाहनचालक चुकत असेल तर त्याला दंड करण्याचा अधिकार पोलिसांना आहे. परंतु अशाप्रकारे कारवाई करणे कितपत योग्य आहे. या घटनेत संबंधित दुचाकीस्वाराला दुखापत झाली असती तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्नही आता विचारला जात आहे.