पुणे - मेट्रोचे कंत्राट मिळवण्यासाठी केंद्रीय सचिवांच्या नावाने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)चे प्रमुख व मेट्रोचे कार्यकारी संचालक यांना फोन करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील चतुःश्रुंगी व कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या दोनही अधिकाऱ्यांना फोन करणारी व्यक्ती एकच असण्याची शक्यता आहे.
काय आहे प्रकरण-
पहिल्या गुन्ह्यात पीएमआरडीएचे प्रमुख सुहास दिवशे (रा. पाषाण) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ जानेवारी रोजी दिवशे हे घरी असताना त्यांना अनोळखी क्रमांकावरून फोन आला. त्या व्यक्तीने केंद्रीय ग्रामविकास खात्याचे सचिव डी. एस. मिश्रा असल्याची बतावणी केली. दिवशे यांना मेट्रोच्या ठेकेरादारांची माहिती विचारून त्यांना फोन करण्यास सांगितले. मेट्रोचे ठेकेदार गुप्ता यांच्याकडून आर्थिक लाभ मिळावा, या उद्देशाने त्यांना सतत फोन केले. त्यांना हा संशयास्पद प्रकार वाटल्यानंतर त्यांची चौकशी केली. त्यावेळी त्यांना हा सर्व फसवेगिरी असल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ चतुःश्रुंगी पोलीस ठाण्यात स्वतः जाऊन तक्रार दिली. याप्रकरणी सहायक निरीक्षक राजेंद्र दहिफळे हे अधिक तपास करत आहेत.
मेट्रो संदर्भातील माहिती घेण्याचा प्रयत्न-
दुसऱ्या घटनेत कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यातही असाच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र रेल्वे कॉर्पोरेशनचे लि. कार्यकारी संचालक गौतम बिऱ्हाडे (वय ५२) यांनी तक्रार दिली आहे. त्यांच्याकडूनही मेट्रो संदर्भातील माहिती घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
हेही वाचा- नागपूर जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूचा शिरकाव