पुणे - जय भवानी, जय शिवाजी... छत्रपती शिवाजी महाराजांच्या नामघोषात किल्ले राजगडावरील पाली दरवाजातून छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती विराजमान झालेल्या पालखीने गडावर प्रवेश केला आणि एकच जल्लोष झाला. पुष्पवृष्टी आणि तुतारीच्या सलामीने किल्ले राजगडाचा परिसर दुमदुमून गेला. औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन शिवरायांनी स्वत: सह सहकाऱ्यांची आग्य्राहून सुटका करुन राजगडावर पोहोचण्याच्या घटनेला ३५४ वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल हा आनंदोत्सव गडावर साजरा करण्यात आला.
पुणे महानगरपालिका व श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन -
पुणे महानगरपालिका आणि श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ३५४ वा आग्य्राहून सुटका स्मृतीदिनानिमित्त या किल्ले राजगड उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळाचे संस्थापक वसंतराव प्रसादे , सुर्यकांत भोसले, संजय दापोडीकर, रश्मी अनिल मते, अजित काळे, अनिरुध्द हळंदे , सुनील वालगुडे, संपत चरवड, सतीश सोरटे, योगेंद्र भालेराव, निलेश बारावकर, अभिजित पायगुडे, शशी रसाळ, गुरुदत्त भागवत, अमोल व्यवहारे, निखिलेश ठाकूर, प्रशांत पायगुडे आदी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत सिद्धार्थ पारखे उपस्थित होते. या कार्यक्रमाला महिलांचा व लहान मुलांचा सहभागही होता.
पारंपरिक वेशात शिवभक्तांचा सहभाग -
सकाळी वंशपरंपरेनुसार गडकरी असलेले सुर्यकांत भोसले यांच्या हस्ते सुर्योदयाच्यावेळी ध्वजारोहण झाले. त्यानंतर पाली दरवाजा ते महाराजांच्या सदरेपर्यंत पालखी मिरवणूक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पारंपरिक वेशात उपस्थितांनी सहभाग घेतला. आनंदोत्सवाच्या पूर्वसंध्येला राजगड पायथ्याच्या येथील पाली गावात गडजागरणाचा कार्यक्रम झाला. राजगड पायथ्याला ढोल-ताशांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी दीपक कसबे यांनी शिवप्रेमींना मार्गदर्शन करीत या घटनेचे महत्त्व सांगितले. खंडोबाच्या माळावरील कार्यक्रमास निलेश भिसे , सौरभ करडे, मारुती आबा गोळे हे वक्ते देखील लाभले व पाल गावचे सरपंच शिर्के, पोलीस पाटील दरडिके आदी मान्यवर उपस्थित होते. राजगड परिसरातील प्रतिष्ठित ग्रामस्थ, सरपंच, पोलीस पाटील देखील सोहळ्याला उपस्थित होते. या उत्सवासाठी अनेक सामाजिक संस्था, पुणे महानगरपालिका, पाली गाव ग्रुप ग्रामपंचायत यांचे विशेष सहाय्य लाभले.
शिवरायांनी केलेल्या पराक्रमाची माहिती व महती सर्वांपर्यंत पोहोचावी म्हणून कार्यक्रम -
वसंतराव प्रसादे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज सन १६६६ रोजी किल्ले राजगड येथे पोहोचले. हा दिवस ३९ वर्षांपासून दोन्ही संस्थांतर्फे साजरा करण्यात येतो. यंदा उत्सवाचे ४० वे वर्ष आहे. शिवरायांनी केलेल्या पराक्रमाची माहिती व महती सर्वांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने आम्ही हा कार्यक्रम राबवत आहोत. पुणे महानगरपालिकेचे यामध्ये आम्हाला मोठया प्रमाणात सहकार्य मिळते. ते यापुढेही असेच मिळत राहिल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.