पुणे - कोरोना संकटामुळे अवयवदान प्रक्रिया बंद होती. अवयवदान प्रक्रिया ठप्प झाल्याने रुग्ण जीवन मरणाच्या रेषेवर उभे राहिले. पुण्यातील जहांगीर रुग्णालयात वर्षाला जे 40 ते 45 अवयवदान केले जात होते, ते या कोरोनामुळे आता 20 वर आले. म्हणजेच, 50 टक्क्यांहून कमी अवयवदान या वर्षभरात झाले आहे, अशी माहिती रुग्णालयाचे ट्रान्सप्लांट फिजिशियन डॉ. श्रीनिवास अंबिके यांनी दिली आहे.
कोरोनामुळे अजूनही नागरिकांमध्ये अवयवदानाबाबत भीती
अवयवांची गरज असलेल्या रुग्णांना शस्त्रक्रियेदरम्यान कोरोनाची लागण होऊ नये यासाठी मेजर शस्त्रक्रिया करू नये, असे आदेश शासनाने जारी केले होते. या पार्श्वभूमीवर रुग्णालयांमध्ये महत्वाच्या अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया बंद होत्या. आता सुदैवाने कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याने पुन्हा रुग्णालयांमध्ये अवयवदान सुरू करण्यात आले आहे. पण, अजूनही नागरिकांच्या मनात असलेली भीती दूर न झाल्याने अवयवदान होत नाही आहे. त्यातही ज्या रुग्णांसाठी नातेवाईकांना अवयवदान करायचे होते, अशांना करताही येत नव्हते.
दोन वर्षांनंतर आता आई करणार अवयवदान
पुण्यातील सागर गायकवाड हा गेल्या 3 वर्षांपासून किडनीच्या विकाराने त्रस्त आहे. तो पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार घेत आहे. सागरची आई त्याला अवयवदान करायला तयार आहे, पण गेल्या दीड वर्षांपासून शासनाच्या नियमावलीमुळे त्याच्या आईला अवयवदान करता आले नाही. अवयवदान सुरू झाल्याने येत्या 2 तारखेला त्याच्या आईला अवयवदान करता येणार आहे.
रुग्णांची प्रतीक्षा यादी मोठी
गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाचा काळ असल्याने मेंदूमृत अवयवदान फार कमी प्रमाणात झाले आहे. सध्या राज्यात मोठ्या प्रमाणावर अवयवदानाची गरज असणारी रुग्णांची प्रतीक्षा यादी खूप मोठी आहे. किडणीसाठी प्रतीक्षेत असणारे रुग्ण डायलिसिसवर आणखी काही महिने जगू शकतात. मात्र, हृदय, यकृत आणि फुफुस यांसारखे अवयव असणाऱ्या रुग्णांची परिस्थिती बिकट असते. कारण त्यांना अवयव प्रत्यारोपण करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. म्हणून, अवयवदानाबाबत जनजागृती देखील आता मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे आहे.
हेही वाचा - 'या' कारणामुळे पुण्यातल्या डॉक्टर दाम्पत्याने आत्महत्या केली असावी, भावाने दिली ही माहिती