पुणे - चीनमध्ये कोरोना विषाणूंमुळे अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. सर्व देशांमध्ये याबाबत कमालीची सतर्कता बाळगण्यात येत आहे. यामुळे भारतीय दुतावासाने देशवासियांच्या सुरक्षिततेसाठी अनेकांना चीनमधून मायदेशी आणले. यामध्ये पिंपरी-चिंचवडच्या सारंग शेलार या विद्यार्थ्याचा समावेश आहे. तो चीनमध्ये एम.बी.बी.एस.चे शिक्षण घेण्यासाठी गेला होता.
गेल्या दोन दिवसांपासून सारंग डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली असून आता तो सुखरुप असल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला आहे. यावेळी सारंगने त्याचा चीनमधील अनुभव शेअर केला.
चीनमधील शेनियांग या शहरात सारंग वास्तव्यास होता. ज्या शहरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे; ते यापासून 1800 किलोमीटर दूर आहे, असे तो म्हणाला. शेनीयांग या शहरात कोरोनाची लागण झालेले दहा रुग्ण होते.
हेही वाचा - VIDEO : पुण्यात भरधाव दुचाकीची पीएमपीला धडक, तरुणाचा मृत्यू
याठिकाणी नवीन वर्षाची सुट्टी सुरू आहे. नागरिक घाबरले आहेत. बाजारपेठांमध्ये नेहमीप्रमाणे गर्दी असायची. मात्र, विषाणू संसर्गामुळे सर्व काही शांत असल्याचे त्याने सांगितले. जीवनावश्यक वस्तू देखील उपलब्ध होत नाही. अनेकदा या ठिकाणचे नागरिक बाहेर येण्यास घाबरत असून ते मास्क लावून फिरतात. नागरिकांच्या मनात भीती आहे. सध्या परिस्थिती खूप गंभीर आहे, असे सारंगने सांगितले.