पुणे : ब्रेक द चेन अंतर्गत राज्य सरकारने राज्यातील 22 जिल्ह्यातील निर्बंध शिथील केले आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील व्यापारी आणि दुकानदारांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तर अकरा जिल्ह्यातील निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या 11 जिल्ह्यांमध्ये पुण्याचाही समावेश आहे. पुणेकरांसाठी मोठा उत्सव असलेला गणेशोत्सव देखील आता तोंडावर आला असून त्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने गणेशोत्सवासाठी काही नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीनुसार गणेश उत्सव देखील साधेपणाने साजरा करावा अशा सूचना पुणेकरांना देण्यात आल्या आहेत.
गणेशोत्सवासाठीचे निर्देश
यावर्षीदेखील गणेशोत्सवात गणपती मूर्तीच्या उंचीवर मर्यादा घालण्यात आल्या आहेत. सार्वजनिक मंडळाची गणेशाची मूर्ती चार फुटांपेक्षा अधिक उंच नसावी असा प्रमुख नियम आहे. तसेच घरगुती गणेशाची मूर्ती दोन फुटापेक्षा जास्त उंचीची नसावी अशा सूचना देखील करण्यात आल्या आहेत.
गणेश भक्तांसाठी ऑनलाइन दर्शनाची व्यवस्था करण्यात यावी
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता असल्यामुळे गणेशोत्सवासाठी कुठल्याही प्रकारची सूट देण्यात आली नाही. त्यामुळे त्याच्या गणेश मंडळांनी गणेश भक्तांसाठी ऑनलाईन दर्शनाची सोय करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
मर्यादीत मंडप उभारावे
कोरोनामुळे या परिस्थितीचा विचार करता स्थानिक प्रशासनाने गणपतीच्या मंडपाबाबतचे धोरण तयार करून मर्यादित स्वरूपाचे मंडप उभारण्यात यावे. गणेशोत्सव साध्या पद्धतीने करणे अपेक्षित असल्याने सार्वजनिक गणपतीची सजावट करताना त्यात भपकेबाजी नसावी.
आरोग्य विषयक उपक्रम घ्यावे
सांस्कृतिक कार्यक्रमाऐवजी आरोग्य विषयक उपक्रम आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे. त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी.
गर्दी करू नये
यंदाच्या गणेशोत्सवात आरती, भजन, कीर्तन व अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच ध्वनीप्रदूषणासंदर्भात नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.
मिरवणुका काढू नये
गणेशोत्सवानिमित्त विसर्जन आणि आगमन मिरवणूका काढण्यात येऊ नयेत. पारंपरिक पद्धतीने विसर्जन करण्यात यावे. लहान मुले आणि वृद्ध नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे. सामाजिक संस्थांच्या मदतीने गणेश मूर्तीच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात यावी.
हेही वाचा - Corona Impact: मुंबईतील मंडळे 'असा' साजरा करणार गणोशोत्सव