पुणे - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुणे शहर भाजप अध्यक्षपदात बदल करण्यात आला आहे. भाजपच्या पर्वती मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांची नवीन शहराध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. तर सरचिटणीस म्हणून कसब्यातून विधानसभेसाठी इच्छुक असलेले गणेश बिडकर यांची निवड करण्यात आली आहे. यामुळे पुणे शहर राजकारणात येणाऱ्या काळात बऱ्याच घडामोडी पाहायला मिळणार आहेत. तसेच विद्यमान शहराध्यक्ष योगेश गोगावले यांची राज्याचे भाजप उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. दरम्यान, शहर भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी दिसणार नाही, येणाऱ्या विधानसभेत सर्वांच्या सर्व जागा जिंकू असा विश्वास व्यक्त करत येणारी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे माधुरी मिसाळ यांनी स्पष्ट केले.
मिसाळ यांची निवड झाल्यानंतर पुणे शहर कार्यालयात मंगळवारी भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. दरम्यान, शहराध्यक्ष झाल्यामुळे माधुरी मिसाळ विधानसभा निवडणूक लढवणार आहेत की, नाही या चर्चेला सुरुवात झाली आहे. मात्र, यावर नवनिर्वाचित अध्यक्ष मिसाळ यांनी आपण विधानसभा निवडणूक लढवणार असून शहरातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी एकत्र घेऊन काम करणार असल्याचे सांगितले. तर नव्याने सरचिटणीस पदाची जबाबदारी मिळालेले माजी नगरसेवक गणेश बिडकर यांनी देखील नवी जवाबदारी स्वीकारत असतानाच कसबा मतदारसंघात विधानसभेसाठी आपली दावेदारी स्पष्ट केली. त्यामुळे आता पुणे भाजपमध्ये नवा भिडू नवा राज, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.