पुणे - सध्या राज्यामध्ये जे पेपर फुटीचे प्रकरण गाजत आहे, यामध्ये कोणत्याही बड्या नेत्याचा अथवा व्यक्तीचा हात असेल तर त्यांच्यावर सरकारतर्फे योग्य कारवाई केली जाईल, यात कोणतीही शंका नाही. मग ती आरोग्य विभागाची परीक्षा असो किंवा इतर परीक्षा असो, प्रत्येक दोषींवर कारवाई झालीच पाहिजे. विद्यार्थ्यांनी खचून जाऊ नये, विद्यार्थ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभी आहे, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी दिली.
दत्त जयंती निमित्त दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरामध्ये त्या आरतीसाठी आल्या होत्या त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा - Pune Crime : बिबवेवाडी परिसरात वाहनांची तोडफोड, टोळीला 12 तासाच्या आत जेरबंद
अमित शहा यांनी छत्रपतींची अवहेलना करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी
बेळगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्यावर शाई फेकण्यात आली. शाई फेकण्यामुळे शिवाजी महाराजांची अवहेलना होत असेल, तर त्यांना एकच सांगणे आहे की सूर्यावरती कुणीही घाण टाकली, तर सूर्य खराब होत नसतो. तर, घाण टाकणाऱ्याच्या अंगावर घाण पडते, हे लक्षात घ्या. अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची अवहेलना करणाऱ्या समाजकंटकांना शोधून चोवीस तासांच्या आत त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी अपेक्षा नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली.
रुपाली ठोंबरे यांचे आघाडीमध्ये स्वागतच आहे
रुपाली ठोंबरे पाटील माझी चांगली मैत्रीण आहे. ती आघाडीत आल्याने आमच्यासोबत तिची नेहमी सहकार्याची भूमिका राहणार आहे. आणि कोणी कोणत्या पक्षात जायचे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, असे मत निलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.
हेही वाचा - HGCO 19 vaccine : तिसरा डोस देण्याची वेळ आली तर एचजीकॉ 19 लसीला प्राधान्य मिळू शकेल - डाॅ. भोंडवे