पुणे - तळेगावमध्ये अल्पवयीन मुलीवर हातोडीने हल्ला (Attack on Girl in Talegaon) केल्याची घटना घडली आहे. ही घटना भयंकर असून आरोपीला कुठल्याही परिस्थितीत जामीन मिळता कामा नये, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Dr Neelam Gorhe) यांनी दिली. तळेगाव परिसरात गुरुवारी रात्री अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेमातून माथेफिरू तरुणाने हतोड्याने हल्ला केल्याची घटना घडली होती.
काय म्हणाल्या नीलम गोऱ्हे -
या प्रकरणातील आरोपीला याआधी देखील पोलिसांनी समन्स दिला होता. मात्र, पोलिसांनी कारवाई करायला उशीर केला असल्यामुळे ही घटना घडली आहे. त्यामुळे आता त्या मुलीला पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी देखील नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. या प्रकरणातील शिवम शेळके या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, त्याला कुठल्याही परिस्थितीत जामीन मिळू नये, असे देखील नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
राज्यपालांनी शक्ती कायदा लवकर पारीत करावा -
राज्यात तळेगावसारख्या घटना सतत घडत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने शक्ती कायदा पारीत केला आहे. तो आता राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. तो राज्यपालांनी लवकर राष्ट्रपतींकडे पाठवावा, अशी विनंती देखील नीलम गोऱ्हे यांनी यावेळी केली.
काय घडलं होत तळेगावमध्ये-
पुण्यातील पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गुरुवारी एका तरुणाने 17 वर्षीय मुलीवर हातोड्याने हल्ला केला होता. या घटनेत मुलगी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एकतर्फी प्रेमातून तरुणाने मुलीवर हल्ला केला असल्याचे सांगितले जात आहे.